मी आंदोलनात सहभागी होणारच; ज्याला कोणाला अडवायचंय त्यांनी अडवावं; अविनाश जाधवांकडून थेट आव्हान
By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 05:22 PM2020-09-20T17:22:38+5:302020-09-20T17:30:14+5:30
लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यासाठी उद्या मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करणार
ठाणे: सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी उद्या मनसेतर्फे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ठाणे शहरातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. मात्र सरकारने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. सरकारला विरोध दर्शवला पाहिजे. त्यामुळे या आंदोलनात ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो. मी आंदोलनात सहभागी होणार असून ज्याला कोणाला अडवायचे त्यांनी अडवावे, असे अविनाश जाधव म्हणाले.
सविनय कायदेभंग आंदोलन..
— avinash jadhav (@avinash_mns) September 20, 2020
सामान्य मुंबईकरांचा आवाज सरकार दरबारी पोहचविण्यासाठी उद्या सकाळी ८.३० वाजता ठाणे स्टेशनहून लोकल प्रवास करणार. मुंबईकर ८ तास नोकरी आणि ६ तास गर्दीत प्रवास करतोय, त्यांच्यासाठी लोकल सेवा मिळावी ह्यासाठी आंदोलन..
मी सहभागी होतोय..तुम्हीही व्हा..
उद्या सकाळी 8.30 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे शहरतर्फे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि पदाधिकारी रेल्वेने प्रवास करून हे आंदोलन करणार आहेत. सकाळी ठाणे रेल्वे स्थानक येथून या आंदोलनास सुरुवात होईल. मनसेचे कार्यकर्ते ठाणे ते भांडूप असा प्रवास रेल्वेने करणार आहेत. इतर सेवा सुरू झाल्या, मग रेल्वे का नको, असा सवाल या आंदोलनातून विचारला जाणार आहे. रेल्वे बंदच राहिली तर उदरनिर्वाह कसा चालणार असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.