देखाव्यातून मांडल्या सफाई कामगारांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:54 AM2019-09-05T00:54:54+5:302019-09-05T00:55:17+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : ‘स्वच्छ आणि सुंदर डोंबिवली’वर टाकला प्रकाश
डोंबिवली : स्मार्ट सिटीअंतर्गत ‘स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली’ ही संकल्पना घेऊन पूर्वेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी सफाई कामगारांची व्यथा मांडली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या सवयींवर या देखाव्यातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. सफाई कामगारदेखील माणूस असून सगळ्यांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प करावा आणि त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ९५ वे वर्ष आहे. सातत्याने समाजहित हाच उद्देश ठेवून मंडळातर्फे श्री गणेश मंदिर संस्थानच्या मुख्य सभामंडपात देखावे साकारण्यात येतात. यंदाच्या वर्षी साकारलेल्या देखाव्यात फडके रोड, भाजीमार्केट आदी ठिकाणच्या विक्रेत्यांकडून सुशिक्षित नागरिक वस्तूंची खरेदी करताना दाखवले आहेत. माणसाच्या वाईट प्रवृत्तीमधील कचरा करण्याची, अस्वच्छता राखण्याचीही सवय यावर प्रकाश टाकला आहे. अस्वच्छतेचा कलंक पुसण्यासाठी सगळ्यांनी सामूहिकपणे जबाबदारी घ्यायला हवी, असा मंडळाचा प्रयत्न आहे. केडीएमसीने ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले असूनही त्याचे पालन ठोसपणे होताना दिसत नाही. महापालिकेने त्यासाठी पुरवलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या डब्यांमधून कचरा ओसंडून वाहत असल्याचे निदर्शनास येते. तसेच अस्वच्छता कशी होते, कोण करतो, त्याची माहिती देणारी ध्वनिफीत ऐकवण्यात येत असून, त्याद्वारे स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात येत आहे. स्वच्छतेचे फायदे, लाभ याची माहिती देण्यात येत आहे. स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली कधी होणार? कोण करणार, असा सवाल करत मंडळाने नागरिकांनाच विचार करायला भाग पाडले आहे. बदल केला तर होऊ शकतो, परंतु मानसिकता असायला हवी. त्यासाठी एक पाऊल स्वच्छतेकडे, असा मौलिक संदेश देखाव्यातील एका मोठ्या वाहनाद्वारे दिला आहे. अशा पद्धतीने स्मार्ट सिटीअंतर्गत कशा पद्धतीने स्वच्छ, सुंदर शहर राखता येऊ शकते, याची माहिती या देखाव्याद्वारे दिल्याची माहिती मंडळाचे सचिव सचिन कटके यांनी दिली.
दरवर्षी एखाद्या विषयावर मंडळातर्फे जनजागृती केली जाते, असे कटके यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी मंडळाचे, व उत्सव समितीचे हेमंत चिंगळे हे अध्यक्ष तर आशीष चौधरी हे कोषाध्यक्ष आहेत, असे ते म्हणाले.
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘लोकमत’ ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे आणि पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र मंडळासोबत असल्याचे समाधान आहे. प्रसारमाध्यमांनीही जागृतीसाठी पुढे यावे आणि शहर स्वच्छ करण्यासाठी योगदान द्यावे, असेही कटके म्हणाले.