पैशाचे अमिष दाखवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:04 PM2021-12-01T15:04:29+5:302021-12-01T15:06:57+5:30
पैशांचे अमिष दाखवून गरजू महिलांना काम लावण्याच्या नावाखाली शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविणाºया एका ३८ वर्षीय दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने नुकतीच अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पैशांचे अमिष दाखवून गरजू महिलांना काम लावण्याच्या नावाखाली शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविणाºया एका ३८ वर्षीय दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने नुकतीच अटक केली. तिच्या ताब्यातून एका ३५ वर्षीय पिडित महिलेची सुटकाही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बुधवारी दिली. एक महिला काही महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून शरीर विक्रयास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निरीक्षक पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण, उपनिरीक्षक भगवान औटी आणि हवालदार श्रध्दा कदम आदींच्या पथकाने मासुंदा तलावासमोरील एका आईस्क्रीमच्या दुकानाजवळ छापा टाकला. या कारवाईच्या वेळी ताब्यात घेतलेल्या एका दलाल महिलेने पैशाच्या अमिषाने अन्य एका महिलेला सेक्स रॅकेटमध्ये अडकवून तिला काही ग्राहकांसोबत शरीर विक्रयाचा व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे समोर आले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये दलाल महिलेला अटक करण्यात आली असून पिडित महिलेची यशस्वीपणे सुटका करण्यात आली आहे.