ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:27 PM2020-09-02T18:27:38+5:302020-09-02T18:29:56+5:30

लोकमान्य नगर परिसरातील घटना 

Woman injured after falling into 5 feet pit in Thane | ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी

ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी

Next

ठाणे :शहरातील खड्ड्यांबाबत एकीकडे ठाण्यातील राजकीय वातावरण चागंलेच तापले असताना बुधवारी ५ फूट खोल खड्ड्यात पडून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना लोकमान्य नगर परिसरात घडली आहे. पहाटे ५.३० च्या सुमारास ही महिला या खड्ड्यात पडली असून वेळेत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे पुढचा अनर्थ टळला.  या घटनेमुळे स्थानिक नागरिक मात्र संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या खाली असलेल्या शहरातील सर्वच चेंबर आणि ड्रेनेज लाईनचे ऑडिट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रीती सिंग यांना उपचारांसाठी पालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

  ढवळे नगर परिसरात राहणाऱ्या प्रीती सिंग (२६) या बुधवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान भाजी आणण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाल्या. लोकमान्य बस डेपो जवळ असलेल्या रस्त्यावर आल्यानंतर या रस्त्यावर जवळपास ५ फूट खड्डा पडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. या खड्ड्यात त्या पडल्यानंतर पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ देखील नव्हती. मात्र मॉर्निग वॉक करणारे काही नागरिक उपस्थित होते . प्रीती सिंग यांनी खड्ड्यातूनच  बाहेर आवाज दिला आणि रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनी त्यांचा आवाज आल्याने त्यांना या खड्ड्यातून बाहेर काढले. प्रीती सिंग यांचा आवाज जर बाहेर गेला नसता तर त्यांच्या जीवावर देखील बेतले असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथान कारभार समोर आला आहे. 


 या रस्त्याच्या खाली ड्रेनेज लाईन गेली असून त्याचा हा खड्डा पडला आहे . वर झाकण टाकून डांबर टाकण्यात आले होते असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे .  मात्र गेल्या १० महिन्यातील ही दुसरी घटना असून या रस्त्याच्या देखभालीकडे ठेकेदारांचे लक्ष नसून शहरातील सर्वच रस्त्याच्या खाली असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेकडून घटना घडल्यानंतर आता या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे . 
          
मी रोज नियमितपणे भाजी आणायला जाते. ज्या ठिकाणी खड्ड्यात पडले त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला होता. मात्र पहाटेच्या वेळी हा खड्डा लक्षात आला नाही. खड्ड्यात पडल्यानंतर मी खालून जोरात आवाज दिल्यानंतर एका दांपत्याने आवाज एकूण स्थानिकांच्या मदतीने मला बाहेर काढले. जर कोणी माझा आवाज एकला नसता तर हा प्रकार माझ्या जीवावर देखील बेतला असता. दुसऱ्यांबरोबर असा प्रकार होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. 
                                               - प्रीती सिंग , जखमी महिला

Web Title: Woman injured after falling into 5 feet pit in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.