ठाण्याच्या उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस शिपायाने वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:15 PM2020-09-18T21:15:05+5:302020-09-18T21:17:38+5:30
उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया एका महिलेचे प्राण वर्तकनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के यांनी वाचविले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया गागी होमोयार जिलार (४५, रा. नौपाडा, ठाणे या महिलेला वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये सुखरुप बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी रात्री ६.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कान्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक एस. पी. मोरे हे शुक्रवारी सायंकाळी उपवन तलाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महिला तलावात आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांना दोन तरुणींनी दिली. ही माहिती मिळताच सोनटक्के यांनी त्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत या महिलेने तलावात उडी घेतली. तिच्यापाठोपाठ सोनटक्के यांनीही उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये दिला या तलावातून सुखरुप बाहेर काढले. आपल्याला जगायचे नसून कोणी बाहेर काढले? अशी ती पोलिसांनाच विचारणा करीत होती. नौपाडयातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला, याची माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.