पदपथाखालील गटारात पडून महिलेचा मृत्यू
By admin | Published: February 8, 2016 04:34 AM2016-02-08T04:34:55+5:302016-02-08T04:34:55+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील पदपथ अचानक खचल्याने त्याखालील १५ फूट खोल गटारात पडून एका महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
ठाणे : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील पदपथ अचानक खचल्याने त्याखालील १५ फूट खोल गटारात पडून एका महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचे सासरे सईद खान यांच्या तक्रारीनंतर ठेकेदार, पालिकेचे अधिकारी, अग्निशमन अधिकारी व नगरसेवकाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राबोडी येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या जमिला अनिस खान (३५) या पती, तीन मुलांसोबत घरी जात असताना अचानक त्यांच्या पायाखालच्या पदपथाचा भाग खचल्याने त्या १५ ते २० फूट खोल गटारात कोसळल्या. त्यातील गाळात अडकल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांना बाहेर काढण्यास वेळेत मदत मिळाली नाही. तसेच घटनास्थळी उशिरा आलेल्या पोलिसांनीही कोणालाही आत जाण्यास मज्जाव केल्याने तिला वेळेत मदत मिळू शकली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. चव्हाण यांनी सांगितले.