मीरा रोड : भार्इंदर स्थानकातून सुटणारी सकाळची नऊ वाजून सहा मिनीटांची भार्इंदर - चर्चगेट महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असे आश्वासन तीन डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी खासदार राजन विचारे यांच्या सोबतच्या प्रवाशांच्या शिष्टमंडळास दिले होते. पण बुधवारी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी रेल्वेमंत्र्यांचे पत्र दाखवत २५ डिसेंबर पासून महिला लोकल पुन्हा सुरू होणार असे सांगितले. तर माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन यांनाही रेल्वे खात्याकडून मंगळवारी पत्र आले असून त्यांनाही २५ डिसेंबरपासून लोकल सुरू करणार असल्याने आंदोलन करू नका असे कळवले आहे. रेल्वेमंत्र्यांच्या पत्रावर दिनांक व जावक क्रमांकच नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एक नोव्हेंबरपासून बंद केलेली भार्इंदर स्थानकातून सुटणारी महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू होण्यासाठी तीन डिसेंबरला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल गुप्ता व अन्य अधिकाऱ्यांसोबत खासदार राजन विचारेंसह महिला प्रवासी व सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आदींची बैठक झाली होती. या बैठकीत २५ डिसेंबरपासून महिला स्पेशल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तीन दिवस सह्यांची मोहीम राबवली. २० डिसेंबरला रेल रोकोचा इशाराही हुसेन यांनी दिला होता. पश्चिम रेल्वेच्या आॅपरेशनल विभागाचे अपर मंडळ व्यवस्थापक विनयकुमार श्रीवास्तव यांनी हुसेन यांना १९ डिसेंबरला पत्र पाठवून २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरु होणार असल्याने आंदोलन करू नका असे कळवले आहे.आ. मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन महिला लोकलसाठी आपण रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिले होते असे सांगत २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरु होणार असल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी व्हॉट्सअॅपवर आलेले गोयल यांचे पत्रही दाखवले. खा. विचारे यांच्या आधी आपण मंत्र्यांना भेटलो होतो. मंगळवारी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळीच मंत्री गोयल यांना आपण पुन्हा सांगितले असता त्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना फोन करून निर्देश दिले होते असे मेहता म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने केलेली मागणी व चालवलेले आंदोलन यामुळे महिला लोकल सुरू होत असून मेहता यांनी दाखवलेल्या रेल्वेमंत्र्यांच्या पत्रावर दिनांक व जावक क्रमांकच नसल्याचा मुद्दा मुझफ्फर यांनी उपस्थित केला. लोकल सुरू करण्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपा उद्योग करत असल्याची टीका त्यांनी केली.खालच्या पातळीचे राजकारण करू नकाखासदार आपण असून रेल्वेची कामे ही आपल्याशी संबंधित आहेत. तीन डिसेंबर रोजीच रेल्वे महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरू होणार याचा निर्णय झालेला असताना भाजपा व काँग्रेसने फुकटचे श्रेय लाटण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करू नये असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले आहे.