भिवंडी-कल्याण मार्गावर लाकडाच्या वखारीतील कारखान्यास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:10 PM2018-03-17T19:10:29+5:302018-03-17T19:10:29+5:30

Wood factories fire on Bhiwandi-Kalyan road | भिवंडी-कल्याण मार्गावर लाकडाच्या वखारीतील कारखान्यास आग

भिवंडी-कल्याण मार्गावर लाकडाच्या वखारीतील कारखान्यास आग

Next
ठळक मुद्देकारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरूआग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाकअग्निशामकदलच्या गाड्यांसाठी पोलीसांनी रोखली वहातूक

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन गावात रस्त्यालगत असलेल्या राममंदिर शेजारील वखारीतील कारखान्यात दुपारनंतर आग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाक झाले. या घटनेने परिसरांत घबराट पसरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
कोन गावात लाकडाच्या वखारी मागील भागात लाकडाचे सोफा,पाळणे व इतर लाकडाच्या साहित्य बनविण्याचा कारखाना होता. हा कारखाना पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता.त्यामध्ये रक्झीन,फोम,लाकडाच्या वस्तु तसेच विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारे वॉर्निश सारखे रसायने साठविलेले होते. कारखान्या शेजारी मोटार गॅरेज असुन त्यामध्ये वेल्डींगचे काम सुरू असते. आज दुपारनंतर अचानक या कारखान्याला लागलेल्या आगीने पत्र्याच्या शेडमधील सामानाने पेट घेतला. लाकडाच्या वखारीत व कारखान्यात आग प्रतिबंधक साहित्य नसल्याने हळूहळू आगीचे लोळ संपूर्ण कारखान्यात पसरून कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. आगीचे रौद्ररूप पहाता कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या रहिवाश्यांनी आपापली घरे बंद करून घराबाहेर धूम ठोकली. या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबीवली महानगरपालिका व भिवंडी महानगरपालिकेतील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
भिवंडी-कल्याण मार्गावर झालेल्या या घटनेचा परिणाम वहातूकीवर झाला.पोलीसांनी अग्निशामकदलास वाट मिळावी म्हणून या मार्गावरील वहातूक रोखून धरल्याने वहातूक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे हाल झाले.सुमारे दोन तासानंतर अग्निशामक दलास आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले.त्यानंतर या मार्गावरील वहातूक पोलीसांनी सुरळीत केली.दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे या घटनेची माहिती नव्हती.या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Wood factories fire on Bhiwandi-Kalyan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.