अंबरनाथ : अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांना आणि त्याच परिसरात राहणाºया नागरिकांसाठी असलेला वडवली रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक रोटरी येथील आमराईतून वळवण्यात आली होती;मात्र आता तोही रस्ता पालिकेने काँक्रिटीकरणासाठी खोदल्याने स्टेशनकडे जाणारा मार्गच बंद झाला आहे. याचा सर्वात जास्त त्रास बसमधून जाणाºया कामगारांना होत आहे.
रस्त्यांचे काम करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. कमीत कमी अडथळा कसा होईल, याचा विचारही होणे गरजेचे आहे. मात्र पालिका आणि एमएमआरडीएमध्ये समन्वयाचा अभाव आहे. शिवाजी चौक ते लोकनगरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी शिवाजी चौक ते रोटरी क्लब चौकापर्यंतचा रस्ता बंद केला आहे. या रस्त्यावर सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्टेशन आणि हुतात्मा चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक रोटरीनजिकच्या खेर सेक्शन भागातील आमराईतील रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. आमराईतील रस्ता सुरु असल्याने वाहतूक वळविणे सोयीचे झाले होते. मात्र आता पालिकेने काँक्रिटीकरण करण्यासाठी आमराईतील रस्ता खोदल्याने स्टेशनकडे जाणारा पर्यायी मार्गदेखील अरुंद झाला आहे. आधीच अरुंद असलेला हा रस्ता खोदल्याने वाहतूककोंडी होत आहे. रस्ता अरुंद झाल्याने वाहने खड्डयात अडकत आहेत. एमएमआरडीएच्या रस्त्याचे काम होत नाही, तोवर या रस्त्याचे काम थांबविणे गरजेचे होते. मात्र पालिकेनेही रस्त्याचे काम केल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे.
आमराईतील रस्ता करणे गरजेचे आहे, त्यामुळे काम सुरू केले आहे. आता एमएमआरडीएचेही काम सुरू झाल्याने पर्यायी रस्त्याची गरज आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, असे नियोजन केले जाईल.- मनीष भामरे,शहर अभियंता, अंबरनाथ