- नितीन पंडितभिवंडी - जन्मदाखल्यामध्ये मुलाच्या नावासोबत वडिलांचे नाव नमूद करीत खालील रकान्यात जन्मदात्या आईचे नाव लिहिले जाणे बंद करून महिलांचा सन्मान करण्यासाठी जन्म दाखल्यावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिण्यात यावे तशी तरतूद जन्म दाखल्यात करावी अशी मागणी भिवंडी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्याकडे श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगी जिल्हा पदाधिकारी संगीता भोमटे,भिवंडी शहर महिला ठिणगी पदाधिकारी गुलाबताई म्हसकर,शारदा लहांगे यांनी निवेदना द्वारे मंगळवारी केली आहे .
समाजातील महिला वर्ग हा नेहमीच वंचित आणि दुर्लक्षित घटक मानला जातो.भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समाना मुलभूत अधिकार प्रदान केला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र महिला आणि विशेषतः माता या समानतेच्या अधिकारापासून अजूनही वंचित आहेत.असा आरोप श्रमजीवीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला असून भारतीय स्वातंत्र्याचे अमृतवर्ष म्हणून साजरे करीत असताना या अमृतवर्षात तरी महिलांना विशेषतः प्रत्येक मातेला समानतेचा अधिकार मिळायला हवा.यासाठी स्त्रीने जन्म दिलेल्या तिच्या बाळाच्या नावासमोर वडिलांसोबत त्या जन्म देणाऱ्या मातेचे नाव सुद्धा लागले गेले पाहिजे.
त्यासाठी महानगरपालिका हद्दीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या जन्मदाखल्यामध्ये तशी नोंद करावी .तसेच या संदर्भात सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांवर, दस्तऐवजावर जिथे कोणत्याही व्यक्तीचे नाव लिहिण्याची सक्ती असते. तिथे नाव-मधले नाव आडनाव असे तीनच कॉलम न करता नाव,आईचे नाव, वडिलांचे नाव,आडनाव असे चार रकाने करावेत व ते भरणे सक्तीचे करून सर्व मातांना त्यांचा समानतेचा अधिकार देण्यात यावा असा निर्णय घ्यावा व तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी विनंती या निवेदना द्वारे श्रमजीवी संघटनेने केली आहे .