कल्याण : निसर्ग मानवाला खूप काही देत असतो, याची जाण ठेवून निसर्गाचे देणे आहे, या कृतज्ञतेच्या भावनेतून नवीन पिढीने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर विनीता राणे यांनी पर्यावरण दिनानिमित्त येथे केले. पर्यावरणाचे रक्षण करणे, हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे आणि त्याचे पालन प्रत्यक्ष कृतीने करावे, असे आयुक्त गोविंद बोडके म्हणाले.
बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी बिर्ला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली तसेच कल्याण सायकल क्लब यांच्या सहकार्याने सायकल रॅली काढली होती. या रॅलीद्वारे ‘पर्यावरणरक्षणाचा व झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश दिला. या रॅलीत महापौरे, आयुक्तांसह सुमारे ८७५ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले.
बिर्ला महाविद्यालयात पालिकेच्या सहकार्याने तुळशीवाटिकेचे उद्घाटन महापौर राणे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, आयुक्त बोडके, वनक्षेत्रपाल कल्पना वाघेरे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्राचार्य अविनाश पाटील, महापालिकेचे सचिव संजय जाधव उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांकडून पर्यावरणरक्षणाचा संदेशकल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक भोई यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी बुधवारी झाडे लावत पर्यावरणरक्षणासाठी आपला हातभार लावला. पश्चिमेतील दुर्गाडी येथील गणेशघाट परिसरातील मोकळ्या जागेत बदाम, वड, अशोक आदी वृक्षांची रोपटी वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आली. त्याचबरोबर याठिकाणी असणाºया मात्र पाण्याअभावी करपू लागलेल्या झाडांनाही पाणी घालण्याचे काम करण्यात आले.