अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांमुळे खाडीत उडी घेणाऱ्या तरुणी बचावल्या
By जितेंद्र कालेकर | Published: April 9, 2024 05:31 PM2024-04-09T17:31:33+5:302024-04-09T17:32:32+5:30
साकेत रोड परिसरातील घटना: दोघींची प्रकृती स्थिर.
जितेंद्र कालेकर, ठाणे: खाडीत उडी मारलेल्या जरणा देवणाथ (१८) आणि काजल यादव (१७) या तरुणी बचावल्या असून त्या दोघींना खाडीतून बाहेर काढण्यात स्थानिक लोकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी डी. एम.पाटील यांना यश आले. ही घटना साकेत रोड परिसरात मंगळवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास घडली. या दोघींनाही उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
साकेत रोड ग्लोबल हॉस्पिटल समोरील साकेत खाडीमध्ये विसर्जन घाटाजवळ या दोन तरुणींनी उडी मारल्याची माहिती त्याच भागातून जाणारे रुस्तमजी अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी डी. एम. पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह स्थानिक रहिवाशाांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने या दोन्ही मुलींना सुखरुप खाडीमधून बाहेर काढण्यात यश आले. जरणा ही माजिवाडा,जय भवानी नगर तर काजल ही कळवा,मनीषा नगर येथे वास्तव्याला आहे. या दोन्ही मैत्रिणी असून त्यांनी खाडीमध्ये कोणत्या कारणांसाठी उडी घेतली, याची चौकशी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. त्या दोघींनाही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.