उल्हासनगर : कॅम्प नं-२ खेमानी परिसरात सिमेंट मिक्सर डंपरने मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान एका तरुणीला चिरडल्याची घटना घडली असून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात डंपर चालकां विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाल्कनजी बारी येथे दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान एका तरुणीला सिमेंट मिक्सर डंपरने चिरडले. या अपघातात दिशा विनोदकुमार किथाने हिचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या दुरवस्थाने तरुणीचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक व तरुणीच्या नातेवाईकांनी केला. खेमानी मार्गे येणाऱ्या अवजड वाहनाला बंदी घालण्याची मागणी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनेने यापूर्वीच केली होती. अपघात प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी सिमेंट मिक्सर डंपर चालकां विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.