वाढीव बिलांविरोधात यूथ काँग्रेसची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:38+5:302021-05-05T05:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची अक्षरश: लूट सुरू आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी किंबहुना खासगी रुग्णालयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची अक्षरश: लूट सुरू आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी किंबहुना खासगी रुग्णालयांच्या या लुटीला चाप बसावा, यासाठी ठाण्यातील यूथ काँग्रेस सरसावली आहे. प्रदेश यूथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या निर्देशानुसार, यूथ काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी यांनी वॉररूमही सुरू केली आहे.
त्यानुसार, ठाण्यातील प्रत्येक खासगी कोविड रुग्णालयाबाहेर फलक दर्शवून जनजागृती करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठेतील काँग्रेसचे मुख्य कार्यालय आणि नौपाडा, बी केबिन अशा दोन ठिकाणी कोविड वॉररूम सुरू केली आहे. याबाबत गिरी म्हणाले, ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारी रुग्णालये कमी पडत आहेत. त्यातच खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारून रुग्णांची लूट करीत आहेत. मध्यंतरी बिलासाठी एका रुग्णाची रिक्षाही जप्त करण्याचा प्रकार घडला होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यूथ काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. हरिदास यादव, तेजस घोलप, दीपक पाठक, अजित ओझा, आदींसह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने यूथ काँग्रेस गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी सरसावली आहे.
ज्या रुग्णांची अथवा नातेवाइकांची केवळ बिलांसाठी अडवणूक होत असेल त्यांनी ९८६७४४८३८३ या क्रमांकावर अथवा वरील हॅश टॅगवर ‘नो एक्स्ट्रा कोविड-१९ बिल’ यावर ट्विट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे; परंतु अशातच अव्वाच्या सव्वा बिले आकारून खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू आहे. बिले अदा केलाशिवाय मृतदेहही दिला जात नाही. त्यामुळेच युवक कॉंग्रेसने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वाढीव बिलांचा प्रकार सहन केला जाणार नाही. वेळप्रसंगी हॉस्पिटलबाहेर आंदोलन केले जाईल.
- विक्रांत चव्हाण, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस, ठाणे
-------
आम्ही हेल्पलाइन तसेच वॉररूम सुरू केली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. खासगी रुग्णालयांनी नागरिकांची लूट थांबवावी. नागरिकांनी वाढीव बिले आकारली जात असतील त्यांनी पुढे यावे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
- आशिष गिरी, जिल्हाध्यक्ष, यूथ कॉंग्रेस, ठाणे
-----------------------------