देशरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे - अनुराधा गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:19 PM2020-03-10T23:19:16+5:302020-03-10T23:19:49+5:30
वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले
भिवंडी : सैन्यदलात जवळपास दोन लाख जागा रिक्त आहेत. भारतासारख्या देशाला ही बाब भूषणावह नाही, तरु णवर्ग सैन्यात भरती व्हायला तयार नाही, त्याला पालकही तेवढेच जबाबदार आहेत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो, आम्हाला सुरक्षितता हवी असते; पण देशाच्या सुरक्षिततेचा विचार आम्ही कधी करायचा? यासाठी तरु ण पिढीचे योगदान काय, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.
वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘भारतीय जवानांच्या शौर्यकथा’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे होते.
गोरे म्हणाल्या की, १९४७ साली देश स्वतंत्र झाला. मात्र, ते समाधान फार काळ टिकले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवनवीन युद्धमालिका सुरू झाल्या. या युद्धांमध्ये लढताना भारतीय जवानांनी जे सोसले आहे ते फारच भयंकर आहे. प्रत्येक जवानांची एकेक खडतर जीवनाची कथा म्हणजेच भारतीय जवानांची शौर्यगाथा आहे. या वेळी गोरे यांनी गिलिगट, स्क्रूडचा किल्ला युद्ध, कारगिल युद्ध, सिकोनची कथा, झोजीला खिंडीत झालेले युद्ध, डोमेल लष्करी ठाणे अशा युद्धांत भारतीय जवान ब्रिगेडियर राजिंदर सिंग, मेजर जनरल थीमय्या , मे.जे.कुलवंत सिंग, मेजर थापा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला, सॅम माणेकशॉ यांच्या कथा सांगितल्या, तर मेजर सौरभ कालिया यांना हाल करून कसे मारण्यात आले, ब्रिगेडियर जिगेंद्रसिंग, योगीन्द्रसिंग, मेजर परमेश्वरन यांच्या साहसी कथा सांगून, भारतीय सैनिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले स्वातंत्र्य जपले आहे.