कल्याण : राज्यभरातील एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समिती नेमण्याचे आदेश दिले. या समितीने तीन आठवड्यांत अहवाल सादर करणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने हा अहवालच उच्च न्यायालयात सादर केलेला नाही. सरकारने कर्मचाºयांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत शिवसेना-भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय मनसे एसटी कर्मचारी संघटनेने घेतला आहे. मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेचे सचिव महादेव म्हस्के यांनी ही माहिती दिली.यासंदर्भात कल्याणमध्ये गुरुवारी एक बैठक झाली. कल्याण आणि ठाणे एसटी डेपोतील कामगारांच्या कृती समितीचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेत आहे. या सत्ताधारी पक्षाने कामगारांविरोधात भूमिका घेतल्याचे म्हस्के यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तर पुढील २५ वर्षांत वेतन आयोग देता येणार नाही, असे वक्तव्य करून कर्मचाºयांच्या जखमेवर मीठ चोळले. याबाबत, आॅक्टोबर महिन्यात एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपासमोर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारने समिती नेमली. समितीचा अहवाल तीन आठवड्यांत विचारात घेऊन तो उच्च न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक होते. पण, हा अहवालच अद्याप सादर झालेला नाही. सत्ताधारी सेना-भाजपा हे कामगारविरोधी असल्याने त्यांनी या आंदोलनास आश्वासनाची पाने पुसली.ठाणे जिल्ह्यात गावागावांत एसटी फिरते. गावकºयांची प्रवासी सेवा करणाºया एसटी कामगारांची सरकार उपेक्षा करते. या सरकारच्या विरोधात अर्थात शिवसेना-भाजपाविरोधात मतदान करा, असे आवाहन एसटी कर्मचारी ठाणे जिल्ह्यातील विविध गावांत फिरून मतदारांना करणार आहे.कल्याणमध्ये एसटी कामगार संघटनेच्या मनसेप्रणीत संघटनेची बैठक पार पडली. त्या बैठकीला ठाणे बस डेपोतील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र एसटी कृती समिती व शिवसेना व भाजपाप्रणीत कामगार संघटना उपस्थित नव्हत्या. या संघटना वगळून हा निर्णय घेतल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.एसटी कामगारांची शिवसेना-भाजपाविरोधात असलेली नाराजी निवडणुकांत भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा स्वबळावर लढत आहे, तर शिवसेनेने राष्ट्रवादीची साथ घेतली आहे. एसटी कामगारांनी अशा प्रकारची भूमिका जाहीर केल्याने त्याचा फटका केवळ शिवसेना-भाजपाला बसणार नसून राष्ट्रवादीलाही बसू शकतो.काँग्रेसला होणार फायदाच्निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी उतरले आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षांचे उमेदवार तुरळक स्वरूपात दिसतात. प्रमुख पक्ष शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना त्यांनाच मतदान न करण्याचे आवाहन केले जात असल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला मिळू शकतो.
जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेना-भाजपाला मतदान नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:54 AM