रोमांचक अनुभव देणारी अहमदाबाद ते दीव आयलॅंड रोड ट्रिप!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 02:51 PM2018-11-30T14:51:12+5:302018-11-30T15:04:25+5:30
भारतातील अॅडवेंचरस आणि सुंदर रोड ट्रिपपैकी एक आहे अहमदाबाद ते दीवचा प्रवास. हा रोमांचक प्रवास करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो.
भारतातील अॅडवेंचरस आणि सुंदर रोड ट्रिपपैकी एक आहे अहमदाबाद ते दीवचा प्रवास. हा रोमांचक प्रवास करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो. गुजरातमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. पण दीवमध्ये वेळ घालवणे जास्त आनंददायी ठरेल. इथे तुम्ही बीच आणि सोबतच ऐतिहासिक स्थळांचही दर्शन घेऊ शकता.
अहमदाबाद ते दीव रोड ट्रिप
अहमदाबाद ते दीव पोहोचण्यासाठी ६ तास ३० मिनिटांचा वेळ लागतो. या मार्गात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही ब्रेक म्हणून थांबून एन्जॉय करु शकता.
अहमदाबाद- बावला-बागोदरा-धोलेरा, भावनगर, जालजा-महुवा-दीव
अहमदाबादहून NH47 मार्गाने जाताना जवळपास तीन तासात तुम्ही राजकोटला पोहोचाल. इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ताही चांगला आहे आणि रस्त्यात खाण्या-पिण्याचेही अनेक चांगले पर्याय आहेत. इथूनही दीवच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. तसे तर तिथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पण लवकर पोहोचायचं असेल तर NH151आणि NH51 चांगला पर्याय ठरेल. या मार्गाने गेलात तर तुम्ही सोमनाथ मंदिराचंही दर्शन घेऊ शकता. येथून दीव आयलॅंड हे केवळ ८० किमी अंतरावर आहे.
दीवमध्ये पाहण्यासाठी काय आहे?
गंगेश्वर महादेव मंदिर
नागाओ बीचपासून ४ किमी अंतरावर गंगेश्वर महादेव मंदिर आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेलं हे मंदिर चांगलंच प्रसिद्ध आहे. हे मंदिर बघण्यासारखं आहे.
नैदा गुहा
गंगेश्वर मंदिरापासून ३.५ किमी अंतरावर असलेली ही गुहा केवळ फिरण्यासाठीच नाही तर फोटोग्राफीसाठीही चांगली संधी आहे. हा दीवमधील लोकप्रिय स्पॉट आहे.
सेंट पॉल चर्च
नैदा गुहेपासून २ किमी अंतरावर पुढे गेल्यास सेंट पॉल चर्च आहे. येथील वास्तुकला बघण्यासारखी आहे. हे चर्च दीवमधील खास जागांपैकी एक आहे.
दीव फोर्ट
सेंट पॉल चर्चपासून जवळपास ०.७ किमी अंतरावर दीव फोर्ट आहे. हा फोर्ट बघण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ लागतो. कारण इथे आल्यावर फोटो काढण्याचा मोह तुम्हाला टाळता येणार नाही.
यासोबतच दीवमध्ये जालंधर बीच, दीव म्यूझिअम, शेल म्यूझिअम, गोमती बीच, कुकरी मेमोरिअल आणि येथील फिशिंग व्हिलेजही एकदा बघण्यासारखं आहे.