निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम असलेलं सिल्वासा, इथे घ्या सुट्टीचा मनमुराद आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:04 PM2019-05-30T15:04:38+5:302019-05-30T15:19:25+5:30
अनेकांना उन्हाळ्यात एखाद्या अशा ठिकाणी फिरायला जायचं असतं, जिथे त्यांना शांतता आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवता येईल.
अनेकांना उन्हाळ्यात एखाद्या अशा ठिकाणी फिरायला जायचं असतं, जिथे त्यांना शांतता आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवता येईल. मात्र उन्हाळा म्हटला की, जवळपास सगळीकडेच गर्दी असते. पण अशीही काही ठिकाणे असतात जिथे फार गर्दी नसते. असंच एक ठिकाण म्हणजे केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा. निसर्गप्रेमींसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
या ठिकाणाचा जास्तीत जास्त भाग हा डोंगर-दऱ्यांनी व्यापलेला आहे. सगळीकडे नुसती हिरवळ आणि डोंगर बघायला मिळतात. निसर्गप्रेमींना यापेक्षा अजून काय हवं असतं. घनदाट जंगलांत इकोफ्रेन्डली रिजॉर्टवर दिवस जावा आणि चांदण्यांसोबत रात्र जावी, गर्दी नसलेला नदीचा किनारा असावा आणि सोबतच वेगवेगळे सुंदर जीव असावेत. चांगला वेळ घालवण्यासाठी अजून काय हवंय. तसं सिलवासा हे एक औद्योगिक शहर आहे. पण दुसरीकडे याला गार्डन सिटीही म्हटलं जातं.
नावातंच आकर्षण
(Image Credit : HolidayIQ)
सिल्वासा हे नाव पोर्तुगीज आहे. ज्याचा अर्थ असं जंगल ज्यात कमालीचं चुंबकीय आकर्षण आहे. तुम्ही मग निसर्गप्रेमी असा वा तुम्हाला रोमांचक काही बघण्याची आवड असेल कुणासाठीही हे ठिकाण सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.
वार्ली जमातीच्या लोकांशी भेट
दादरा आणि नगर हवेली नावाचे दोन वेगवेगळे प्रदेश एकत्र आल्यावर हा केंद्र शासित प्रदेश तयार झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर हे ठिकाण आहे. इथे राहणारे लोक हे मूळ वर्ली जमातीचे आहेत. आजही येथील लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची जीवनशैलीही फार सरळ आणि साधी आहे. त्यांची चित्रकला त्यांच्या या जीवनाला आणखीन आकर्षक करते.
जीवनाशी मिळते-जुळते नृत्य
वर्ली जमातीचे लोक कलेचे साधक आहेत. त्यामुळे केवळ चित्रकलाच नाही तर नृत्यही त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. नृत्याशिवाय यांचं जीवन अधुरं आहे. वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे नृत्य इथे केले जातात. उन्हाळ्यात सामान्यपणे भावडा नृत्य केलं जातं. हे मुखवटा घालून केलं जाणारं नृत्य आहे.
पोर्तुगाल संस्कृतीचं दर्शन
(Image Credit : www.silvassaonline.in)
सिलवासा शहराने पोर्तुगालांच्या आठवणी कायम ठेवल्या आहेत. शहरात फिरत असताना तुम्ही या गोष्टी बघू शकता. येथील रोमन कॅथलिक चर्च बघण्यासारखं आहे. शहराच्या मधोमध हे चर्च आहे. हे चर्च १८९७ मध्ये तयार करण्यात आलं होतं. तसेच तुम्ही इथे आल्यावर पोर्तुगालच्या जुन्या कॉलनीमध्येही जाऊ शकता.
कधी जाल?
तसे तर तुम्ही वर्षभरातील कोणत्याही वेळी इथे जाऊ शकता. पण मार्च ते नोव्हेंबरपर्यंत येथील वातवरण अधिक मनमोहक असतं. येथील रात्र कधीच संपू नये अशी वाटते. तर पावसाळ्यात हा परिसर हिरवागार होतो.
कसे जाल?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ येथूनच जातो. हा मार्ग पश्चिम भारताच्या मुख्य मार्गांशी जोडलेला आहे. रेल्वेने इथे पोहोचण्यासाठी गुजरातचं वापी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. हवाई मार्गाने जायचं असेल तर मुंबई एअरपोर्टला पोहोचून, रेल्वेने पुढे जाऊ शकता.