भूतानमध्ये एन्ट्रीसाठी बदलले नियम, आता 'या' कागदपत्रांची असेल गरज!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 12:23 PM2018-10-20T12:23:10+5:302018-10-20T12:23:22+5:30
जर तुम्ही भूतानला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा खात्री करुन घ्या. आता भूतानमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नवीन नियम तयार झाला आहे.
जर तुम्ही भूतानला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा खात्री करुन घ्या. आता भूतानमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नवीन नियम तयार झाला आहे. आतापर्यंत भारतातून भूतानमध्ये जाण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज पडत होती. पण आता नव्या नियमीनुसार वेगळ्या कागदपत्रांची गरज लागणार आहे.
जानेवारी २०१९ पासून भूतान जाणाऱ्यांकडे वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट असणे अनिवार्य असेल. नव्या नियमांनुसार, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखे कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत. लहान मुलांसाठी इंग्रजीमध्ये लिहिलेला जन्माचा दाखला अनिवार्य असेल.
आतापर्यंत भूतानमध्ये ज्या कागदपत्रांव्दारे एन्ट्री दिली जात होती. ते योग्य किंवा अधिकृत आहेत की नाही याबाबत संशय राहत होता. अधिकाऱ्यांना हे कळू शकत नव्हतं की, ही कागदपत्रे योग्य आहेत की नाही. त्यामुळे आता पासपोर्ट आणि वोटर आयडी कार्ड अनिवार्य केलं आहे.
आतापर्यंत भूतानला जाणाऱ्या लोकांना सरकार द्वारे जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारावरच एक स्लिप दिली जात होती. आता या स्लिपऐवजी पर्यटकांना एन्ट्री परमिट दिलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या परमिटवर पर्यटक केवळ पारो आणि थिंपू येथीलच प्रवास करु शकतील. तर तुम्हाला या दोन जागा सोडून इतरही ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्हाला स्पेशल परमिटची गरज पडेल.