एकट्याने किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कर्नाटकातील कुर्ग हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकतं. कारण इथे फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी इतकी ठिकाणे आहेत की, आठवड्याभराची सुट्टीही कमी पडेल. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये इथे वेगवेगळा नजारा तुम्हाला बघायला मिळू शकतो. भारतात कुर्गमध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. चहाच्या बागा, चारही बाजूंनी पसरलेलं नैसर्गिक सौंदर्य आणि हिरव्यागार झाडांची जंगले या ठिकाणाला चारचाँद लावतात असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
कुर्गमध्ये फिरण्यासाठी वेळ मिळाला तर तुम्ही भागमंडला, तालकावेरी, निसारगधमा, दुबरे, अबे वॉटर फॉल, इरुपू वॉटर फॉल आणि नागरहोल नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. तर ट्रेकिंगची आवड असेल तर पुष्पागिरी आणि ब्रम्हगिरीला भेट देऊ शकता.
अब्बे फॉल्स - इरुपू फॉल्स
अब्बे वॉटर फॉल हा सुंदर चहाच्या बागांमध्ये स्थित आहे. याच्या आजूबाजूला खूपसारी सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. डोंगरावरुन खाली कोसळणारं पाणी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि मनालाही वेगळाच आनंद देऊन जातं. यासोबतच येथील इरुपू फॉल्सही आवर्जून बघावा असाच आहे. इथे एक पवित्र मंदिरही आहे.
मदिकेली किल्ला
या किल्ल्याची खासियत म्हणजे हा किल्ला १७ व्या शतकात चिखलापासून तयार करण्यात आला होता. नंतर १८१२-१८१४ दरम्यान विटा आणि मोर्टारने मजबूत करण्यात आला होता. आतून आणि बाहेरुन हा किल्ला बघण्यासारखाच आहे.
नामड्रोलिंग मोनेस्ट्री
नामड्रोलिंग मोनेस्ट्री हे साधारम ५ हजार बौद्ध भिक्खुंचं घर आहे. हे शिक्षा आणि दीक्षा देण्याचं रिट्रीट सेंटरही आहे, इथे भेट देऊन तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल.
अॅडव्हेंचरसाठी बेस्ट आहे कुर्ग
कुर्गला येणाऱ्या पर्यटकांचा उद्देश आराम मिळवणे सोबतच अॅडव्हेंचरचा आनंद घेणे हा असतो. कारण इथे निसर्गासोबतच वेगवेगळ्या अॅडव्हेंचरस अॅक्टिविटीजचा आनंद घेण्याचीही संधी आहे. त्यामुळेच या ठिकाणाला अॅडव्हेंचर कॅपिटल ऑफ कर्नाटक म्हटलं जातं. माऊंटेन क्लायम्बिंगपासून ते जंगल ट्रेकिंग, राफ्टिंगपासून ते फ्लाइंग, एलिफंट कॅम्पपासून ते फिशिंगपर्यंत सर्वच गोष्टी करु शकता.
कधी जाल?
कुर्गला फिरायला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे महिना बेस्ट मानला जातो. पण फेब्रुवारी ते मे महिन्यात या हिल स्टेशनवर येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असते. कारण यावेळी वातावरण फारच वेगळं असतं.
कसे पोहोचाल?
कुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय मदिकेरीला आहे. इथे येण्यासाठी सर्वात जवळचं विमानतळ मॅंगलोर आहे. येथून मदिकेरीचं अंतर साधारण १ तास आहे. बॅंगलोर, मैसूर आणि कालीकटपासून मदिकेरीसाठी बसेस आणि टॅक्सीही मिळतील. रेल्वेने तुम्ही म्हैसूर आणि थालेसरीला पोहोचू शकता.