गोव्यात मोकळ्या जागेत मद्यसेवन पडू शकतं महागात, १० हजारांचा दंड केला जाईल वसूल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:36 PM2019-01-25T13:36:17+5:302019-01-25T13:37:54+5:30
गोव्यामध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांसोबत वाढत चाललेल्या अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे सुरू केले आहे.
गोव्यामध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांसोबतच वाढत चाललेल्या अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी गोवा सरकारने कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. गोव्यातील बीचेसवर आता खुल्या ठिकाणी मद्यसेवन केल्यास आणि जेवण तयार केल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. हा दंड न भरल्यास तरुंगातही जावं लागण्याची वेळ येणार आहे.
गोव्याला जाऊन एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण आता गोव्यातील सुंदर समुद्र किनाऱ्यांवर बसून मद्यसेवन करणे, कचरा फेकणे आणि मोकळ्या जागेत जेवण तयार करणे महागात पडू शकतं. गोवापर्यटन विभागाने याबाबत कठोर नियम तयार केले आहेत. यापैकी काहीही करताना कुणी आढळलं तर ग्रुपमध्ये असणाऱ्यांना १० हजार रूपये आणि एकट्या व्यक्तीला २ हजार रूपये दंड भरावा लागू शकतो. नियम तोडण्यासोबतच दंड न भरणाऱ्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
गोव्यात येणारे पर्यटक समुद्र किनाऱ्यांवर मद्य घेऊन येतात आणि बॉटल्स तिथेच वाळूमध्ये फेकून जातात. यामुळे वेगवेगळ्या दुर्घटना घडत होत्या. सोबतच नशेत लोक समुद्रात स्वीमिंग करता येत नसतानाही दंगा-मस्ती करू लागतात. यानेही अनेक दुर्घटना घडत होत्या. तसेच आजूबाजूला झोपड्यांमध्ये राहणारे लोक इथे येणाऱ्या पर्यटकांना मद्य विक्री करतात, मोकळ्या जागेत कुठेही जेवण तयार करायला लागतात. त्यामुळे सगळीकडे कचराही पसरू लागलाय. हे बघता गोवा सरकारने हा दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
गोवा सरकार आणि पर्यटन विभागाकडून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथे सांभाळून एन्जॉय करा. अन्यथा तुम्हाला हे वागणं महागात पडू शकतं.