तारुण्याच्या रसरशीत ऊर्जेसाठी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 05:30 PM2017-09-26T17:30:01+5:302017-09-26T17:32:52+5:30
निसर्गाच्या कुशीत शिरा आणि करा ‘काया’पालट..
- मयूर पठाडे
का येतो आपल्याला ताण? का येतो कधीकधी पच्रंड वैताग? चिडचिड होते, एखाद्यावर ओरडावंसं वाटतं, काही प्रसंगी तर त्याला बुकलून काढावंसं वाटतं..
कशामुळे होतं हे सारं?..
त्यातली प्राथमिक आणि आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात जर पुरेशी एनर्जी नसली, कामाच्या ओझ्यानं किंवा इतर काही गोष्टींनी आपला पेशन्स संपलेला असला, काही करण्याचा उत्साहच आपल्यात नसला तर आपली चिडचिड व्हायला लागते. टेन्शन येण्यामागे एनर्जी नसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे.
मग कशी वाढवायची ही एनर्जी? कुठून आणायचा उत्साह?
बºयाचदा ही एनर्जी आणि उत्साह खाण्यापिण्यातून आणि एनर्जी ड्रिंक्समधून मिळत नाहीच. त्यासाठी त्या वातावरणातून बाहेर पडायला हवं असतं. आपल्या कामातून आपण आता ब्रेक घ्यायला हवा, काहीतरी वेगळं करायला हवं हे आपल्याला सांगणारा तो संकेतच असतो. शरीराचा, मनाचा हा संकेत आपण पाळायला हवा.
त्यासाठी कामातून ब्रेक घेणं म्हणजेच काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणं.. यासारखा दुसरा रामबाण इलाज नाही. आहे त्या गोष्टी तर आपल्याला सोडता येत नाहीत, पण थोड्या काळासाठी त्यापासून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.
आपली गेलेली एनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.
किती गोष्टींनी आपण रोज त्रस्त असतो?.. कारणं वेगवेगळी असतील, पण हाच अनुभव आपण वेगवेगळ्या वेळी घेत असतो की नाही?.. भीती, चिंता, संताप, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, वादविवाद, कामांचे डोंगर..
कोणालाच ते चुकत नाहीत.. पण एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तर बघा.. तुम्हाला काय काय मिळतं ते..
निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल.. तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल, एवढंच नाही, संशोधकांनी तर सिद्धच केलंय, तुम्ही जर वारंवार निसर्गाच्या सान्निध्यात जात असाल तर तुमची कांतीही तजेलदार होईल, तुम्ही अधिक तरुण तर व्हालच, वार्धक्य तुमच्या जवळ येण्यालाही कचरेल..