- अमृता कदमसोशल मीडियावर सध्या सोनम कपूरचं नवीन फोटोशूट चर्चेत आहे. हंपीतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या पार्श्व्भूमीवर केलेलं हे फोटोशूट सोनमच्या रूपाला चारचाँद लावत आहे.
हम्पी. एकेकाळचं हे वैभवशाली नगर आजही आपल्या भूतकाळाच्या खुणा अभिमानानं बाळगून आहे. त्यामुळेच या लोकेशन्सची निवड सोनमनं करावी यात काहीच आश्चर्य नाही. सोनमप्रमाणेच तुम्हीही हंपीची एक मस्त ट्रीप प्लॅन करु शकता. केवळ फोटोसेशनसाठी नाही तर या शहराला अधिकाधिक एक्सप्लोअर करण्यासाठी.
आज कर्नाटकामध्ये असणारं हे शहर मध्ययुगीन काळात विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. तुंगभद्रा नदीच्या काठी हे शहर वसलं आहे. आज हंपीला काय काय पाहता येतं, असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर इथे तुम्हाला अनेक मंदिरं पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं मंदिरं असली तरी तुम्ही अजिबात कंटाळत नाही. कारण इथलं प्रत्येक मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या शहराच्या प्रवेशद्वारावरच हजारा राम मंदिर आहे. त्यानंतर आत गेल्यावर अद्भुत मंदिरं पाहायला मिळतात. अर्थात, यातली बरीच मंदिरं ही आज भग्नावस्थेत आहेत. विजयनगर साम्राज्याचा इतर राज्यांसोबतचा संघर्ष आणि नंतरच्या काळातली परकीय आक्र मणं हे त्यामागचं एक कारण आहे. पण भग्नावस्थेत असली तरी या मंदिरांच्या स्थापत्यातलं सौंदर्य लपून राहात नाही.
इथलं रथ मंदिरं तर एका विशाल दगडातून कोरु न काढलेलं आहे. आरबीआयनं 50 रूपयांची जी नवीन नोट छापली आहे, त्यावर याच रथमंदिराचं चित्र आहे. हे मंदिर तब्बल 600 वर्षांपूर्वी बांधलं गेलं आहे. यावरु नही विजयनगरच्या कला-स्थापत्याच्या वैभवाची कल्पना यावी.
विठाला मंदिर तर त्याहूनही अद्भुत आहे. हे मंदिर 56 स्तंभांवर उभं आहे आणि या स्तभांवर आघात केल्यावर त्यातून चक्क मधुर संगीत ऐकायला मिळतं. याच मंदिराच्या पूर्वेकडे एक शिलारथ आहे. या रथाची चाकं चक्क दगडाची आहेत. आणि या दगडी चाकांवर हा रथ चालायचाही. विजयविठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, हजारराम मंदिरही पर्यटकांना आकर्षून घेतात.
मंदिरांबरोबरच महाल, त्याकाळातले तहखाने, तलाव, पुष्करणीही हंपीमध्ये पाहायला मिळतात. या अद्भुत सांस्कृतिक वारशामुळेच युनेस्कोनं जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये हंपीचा समावेश केला आहे.हंपीला परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. आवर्जून इथे येणा-या भारतीय पर्यटकांची संख्या मात्र कमी आहे. हंपीला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटीही उत्तम आहे. परदेशी पर्यटकांमुळं इथे मोजकीच आणि महागडी हॉटेल्स आहेत. पण तुमच्या-आमच्या खिशाला परवडेल अशी होम स्टेची सुविधाही उपलब्ध असल्यामुळे बजेटची फार चिंता करु नका. गुलाबी थंडीत, सोनेरी सूर्यप्रकाशामध्ये इतिहासाचं हे वैभव शांतपणे डोळ्यांत साठवण्यासारखा आनंद दुसरा नाही. त्यामुळे हंपीला तीन ते चार दिवसांची एक मस्त ट्रीप लगेचच प्लॅन करु न टाका. आणि हो, सोनमप्रमाणे फोटोग्राफर नसला तरी हरकत नाही. आपली सेल्फी स्टीक आहेच ना! आपणच आपलं फोटोसेशनही करून टाकायचं.