आयुष्यभर ऊर्जा देणारं प्रवासातलं संचित..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 05:23 PM2017-09-26T17:23:13+5:302017-09-26T17:25:10+5:30
ते जपून ठेवायलाच हवं..
- मयूर पठाडे
मौजमजा करण्यासाठी, आपले सारे ताणतणाव विसरण्यासाठी आपण प्रवासाला निघतो, पण खरंच किती जणांना हे पथ्य पाळता येतं. बाहेर पडले तरी आॅफिसमध्ये आता काय असेल, सारी कामं व्यवस्थित होत असतील की नाही, माझ्या घराकडे कोण बघेल.. असंख्य चिंता आणि काळज्यांचं गाठोडं आपण सोबतच बाळगलेलं असतं.
त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, एकदा बाहेर पडल्यानंतर नसत्या काळज्यांनी स्वत:चा जीव पोखरून घेऊ नये. त्यापेक्षा आपली ही ट्रिप संस्मरणीय कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण प्रवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नव्या ऊर्जा देऊन जातात आणि आयुष्यभर पुरेल असं संचितही त्या आपल्याला पुरवतात.
प्रवास संस्मरणीय होण्यासाठी..
प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच, पण केवळ एखाद्याच गोष्टीवरुन आपलं पूर्ण मतही बनवायला नको.
एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील साºया महत्त्वाच्या गोष्टी तर पाहायलाच हव्यात, पण केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणची कला, खाद्यसंस्कृती.. या साºयाच गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.
एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपण हमखास तिथल्या खाद्यपदार्थांची चव घेतोच, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. त्या जेवणाची, त्या पदार्थाची लज्जत आणखीच वाढेल आणि नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.
बॅगपॅक करून जगप्रवासाला निघालेली किंवा कायम वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देणारे भटके कायम याच ट्रिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं आपण जशी पाहतो, तशीच त्या ठिकाणची वेगवेगळी माणसंही आपण आवर्जुन पाहिली पाहिजेत. ही माणसं कदाचित तुम्हाला इतकं काही देऊन जातील की नंतर ती तुमच्या आयुष्याचाच एक भाग होऊन जातील.. पुढच्या पिढीतही तो वारसा अधिक बळकट होईल..