2018मध्ये कुठे फिरायला जायचं ते आताच ठरवा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:19 PM2017-11-07T18:19:08+5:302017-11-07T18:29:07+5:30
‘लोनली प्लॅनेट’ने 2018 साली भेट देण्यासाठी सर्वांत योग्य देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांपैकी कोणताही एक देश तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या ‘विश लिस्ट’ वर ठेवू शकता.
अमृता कदम
परदेशी पर्यटनाचे प्लॅन हे ऐनवेळी ठरवता येत नाहीत. त्यासाठी अगदी तीन-चार महिने आधीच नियोजन करावं लागतं. त्यामुळेच जर तुम्ही पुढच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारीच्या दरम्यान कुठे जाण्याचा बेत करत असाल तर तुम्हाला ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझिनची मदत होऊ शकते. ‘लोनली प्लॅनेट’ने 2018 साली भेट देण्यासाठी सर्वांत योग्य देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांपैकी कोणताही एक देश तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या ‘विश लिस्ट’ वर ठेवू शकता.
1. चिली
या देशाचं नाव वाचून तुम्हाला कदाचित थोडं आश्चर्य वाटेल. पण पूर्वेला अॅण्डीज पर्वतांची रांग आणि पश्चिमेला पॅसिफिक महासागर, उत्तरेला अटाकामाचं वाळवंट आणि दक्षिणेला पँटागोनिया...चिलीमध्ये तुम्हाला निसर्गाची हरविध रूपं पहायला मिळतात. अर्थात, तुम्हाला चिलीसाठी डायरेक्ट फ्लाइटपेक्षा कनेक्टिंग फ्लाइट्सचेच पर्याय सर्वांत जास्त आहेत.
2.दक्षिण कोरिया
हा देश उत्तमोत्तम कॅफे आणि बारसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण कोरियातलं पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेलं ठिकाण अर्थातच राजधानी सेऊल आहे. त्याचबरोबर अगदी पाच हजार वर्षांपासूनचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक ठिकाणंही दक्षिण कोरियामध्ये आहेत. आणि जर तुम्हाला खेळामध्ये रूची असेल तर तुम्हाला हे नक्की माहित असेल की 2018 च्या हिवाळी आॅलिंम्पिकचं यजमानपद दक्षिण कोरियाकडेच आहे.
3.पोर्तुगाल
गेल्या काही वर्षांपासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कला, संस्कृती अणि खाद्यपदार्थांमुळे पोर्तुगाल पर्यटकांचं आकर्षण बनत आहे. शिवाय इतर युरोपियन देशांपेक्षा पोर्तुगालची ट्रीप बजेटमध्येही बसणारी असल्यामुळं पर्यटक या देशाकडे वळत आहेत. या छोट्याशा देशांत तब्बल 300 सुंदर समुद्र किनारे आहेत.
4. जिबाउटी
आफ्रिकेतल्या या देशाचं नावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण इथे तुम्हाला बीचेस, वाळंवटी प्रदेश, क्षारांचे स्फटिक असलेले तलाव अशी वेगवेगळी आकर्षणं पाहायला मिळतात. शिवाय आफ्रिकेतली आदिवासी संस्कृतीही तुम्हाला जवळून अनुभवता येते.
5.न्यूझीलंड
‘कहो ना प्यार है’ या गाण्यातलं सुंदर बीच अजूनही सगळ्यांना आठवत असेल. या चित्रपटानंतर बॉलिवूडला न्यूझीलंडच्या सौंदर्याचा शोध लागला. आणि पाठोपाठ अनेक भारतीय पर्यटकांची पावलंही न्यूझीलंडकडे वळली. चित्रात दिसावेत असे तलाव, नद्या, रेनफॉरेस्ट, ग्लेशिअर्स, हिमाच्छादित शिखरं असं सगळं काही या एका देशात पहायला मिळतं. शिवाय तुम्हाला अॅडव्हेन्चर, साहसी खेळांची आवड असेल तर न्यूझीलंडमध्ये वॉटर स्पोर्ट, आइस स्पोर्टचेही वेगवेगळे प्रकार आहेत.
6. माल्टा
माल्टामध्ये अगदी प्रागैतिहासिक काळाच्या खाणाखुणा सापडतात. एखाद्या ओपन एअर म्युझियमसारखा वाटणारा हा देश आहे. भूमध्य पद्धतीचं आल्हादायक हवामान, सगळीकडे पसरलेली निळाई आणि थक्क करणारं स्थापत्य...पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अजून काय हवं? स्वप्नभूमीप्रमाणे भासणा-या या ठिकाणी अजून तशी पर्यटकांची गर्दीही फार नसते. त्यामुळे निवांतपणाचाही अनुभव तुम्हाला येतो.
7. जॉर्जिया
हा युरोपियन देश पण काहीसा आॅफबीट पण तरीही निसर्गसौंदर्यानं नटलेला देश आहे. लांबचलांब पसरलेले वाइनयार्डस ही इथली खासियत. द्राक्षांच्या मळ्यासोबतच वाइनरींमध्येही तुम्ही फिरु शकता. वाइन्सचे शौकीन असाल तर तुम्हाला इथे उत्तम प्रतीची वाइन टेस्ट करायला मिळते. हॉर्स रायडिंग, स्कीइंग, रिव्हर राफ्टिंगसाठीही जॉर्जियात अनेक ठिकाणं आहेत.
8. मॉरिशस
मॉरिशसचा रूपेरी वाळूचा समुद्रकिनारा जगभरातल्या पर्यटकांना आकर्षून घेतो, नीलमण्यासारखं पाणी, लक्झरी रिसॉर्ट, प्रवाळ बेटं आणि कियाकिंग, डायिव्हंगसारखे वॉटर स्पोर्टस अशी आकर्षणं मॉरिशसमध्ये प्पाहायला मिळतात. क्रूझवरच्या सहलीपण मॉरिशसचं वैशिष्ट्य आहे.
9. चीन
चीनबद्दलची माहिती ब-याचदा आपल्याला लष्करी, राजकीय घडामोडी यांच्यासंबंधानेच मिळते. पण आशियातली एक जुनी संस्कृती असलेला हा देश खाणं, हवामान, धर्म, स्थापत्य या सर्वच बाबतीत विविधतेनं नटलेला आहे. झगमगत्या बीजिंग आणि शांघायबरोबरच चीनमध्ये अनेक प्राचीन, ऐतिहासिक स्थळं आहेत. चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीच्यापलिकडेही बरंच काही आहे, जे पर्यटकांना खेचून घेऊ शकतं.
10. दक्षिण आफ्रिका
‘लॅण्ड आॅफ बिग फाइव्ह’ (हत्ती, सिंह, चित्ता, गेंडा, रानगवा) म्हणूनच हा देश प्रसिद्ध आहे. त्यामुळेच वाइल्ड लाइफ सफारीसाठीच पर्यटक आवर्जून दक्षिण आफ्रिकेला भेट देतात. पण सफारीव्यतिरिक्तही बरंच काही या देशात पर्यटकांना पहायला आणि करायला मिळतं. हि-याच्या खाणी, धबधबे, माउण्टन क्लायबिंग, केव्हिंग, सर्र्फिंग आणि इतरही बरंच काही. आफ्रिकेत तुम्हाला तुमच्या ट्रीपचा प्रत्येक क्षण सार्थकी लागल्याक्जा अनुभव येईल.
या देशांमधले बरेचसे देश हे पर्यटनाच्या बाबतीत काहीसे आॅफबीट आहेत. त्यामुळे तुम्ही जर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत जात नसाल तर फ्लाइटची उपलब्धता, पर्यटनाला जाण्याचा अनुकूल काळ, तिथलं हवामान यासंबंधीची नीट माहिती घेऊन मगच तुमची ट्रीप प्लॅन करा.