- अमृता कदमविजयादशमीचा दिवस म्हणजे सत्याचा असत्यावरच्या विजयाचा दिवस. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात दसरा विविध पद्धतीनं साजरा केला जातो. पण म्हैसूरच्या दस-याची शान काही औरच! म्हैैसूरचा हा शाही दसरा आयुष्यात एकदा तरी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवायलाच हवा. शिवाय यंदा दसरा शनिवारी आला आहे. त्यामुळे म्हैसूरसाठी एक मस्त वीकेन्ड ट्रीपच प्लॅन करु शकता.म्हैसूरच्या दसरा उत्सवाला पाच शतकांची परंपरा आणि आजही त्याच परंपरागत पद्धतीनं दसरा साजरा होतो. केवळ म्हैसूरमधले लोकच नाही तर अनेक देशी-विदेशी पर्यटकही या सोहळ्याला हजेरी लावतात.
म्हैसूरचा हा दसरा म्हैसूरंच राजघराणं साजरा करतं. राजघराण्यांकडून शस्त्रास्त्रांची खास पूजा केली जाते आणि मग विजययात्रेनं या दसरा महोत्सवाची सुरूवात होते. सजवलेले हत्ती, उंट, घोडे आणि विविध देखावे सादर करणारे चित्ररथ या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेत सहभागी होणा-या हत्तींना खास प्रशिक्षण दिलेलं असतं.म्हैसूरच्या राजवाड्यापासून शहरातल्या बन्नीमन्ताप मैदानापर्यंत ही शोभायात्रा चालते. दस-याच्या दिवशी म्हैैसूरच्या राजवाडा, शहरातली मंदिरं आणि प्राचीन वास्तूंना रोषणाई केलेली असते. दसरा महोत्सवापूर्वी दरवर्षी म्हैैसूरच्या राजवाड्यातले तब्बल 25 हजार दिवे बदलले जातात. आणि मग हा राजवाडा उजळून निघतो.या दिवशी म्हैैसूरच्या राजघराण्यातर्फेमहालाच्या परिसरात अनेक सांस्कृतिक कार्यक्र मांचंही आयोजन केलं जातं. वेगवेगळे खेळ, काव्य संमेलन, फूड फेस्टिव्हल, फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन दस-याच्या निमित्ताने केलं जातं.नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दस-यापर्यंत इथल्या राजघराणं दररोज आपला दरबारही भरवतं.
कर्नाटक एक्झिबिशन आॅथोरिटी दस-याचं औचित्य साधून दोड्डाकेरे मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन करतं. या मेळाव्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातले अनेक उद्योग त्यांचे स्टॉल्स लावतात. त्यांच्या नवनवीन उत्पादनांची प्रसिद्धी आणि मार्केटिंग करतात. दसरा महोत्सवाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद हे यामागचं कारण आहे.दस-यासाठी येणा-या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक पर्यटन विभागाकडून दसरा महोत्सवासाठी खास तयारी केली जाते.दसरा महोत्सव हा केवळ त्याच्या भव्यता आणि शाही अंदाजामुळे पाहण्याजोगा ठरत नाही, तर आपली परंपरा टिकवून ठेवण्यासाठीचे इथल्या लोकांचे प्रयत्नही वाखाणण्यासारखे आहेत.कर्नाटक पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर तुम्हाला दसरा महोत्सवासाठीचे वेगवेगळे पॅकेजेसही पहायला मिळतात. यामध्ये म्हैसूर-बेंगलोर,म्हैसूर-बेंगलोर-कूर्ग असे वेगवेगळे पर्याय आहेत. यंदा दसरा शनिवारी आल्यामुळे तुम्ही म्हैसूर-बेंगलोरचे पॅकेज घेऊ शकता. दस-याचा शाही सोहळा अनुभवण्याबरोबरच तुमची एक मस्त वीकेण्ड ट्रीपही होईल.