निसर्गासोबतच अॅडव्हेंचरचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन पराशर लेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 12:03 PM2019-01-16T12:03:06+5:302019-01-16T12:09:12+5:30
हिमाचल प्रदेशातील मंडी गावातील पराशर लेक बघणे एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरु शकतो.
हिमाचल प्रदेशातील मंडी गावातील पराशर लेक बघणे एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरु शकतो. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण २७३० मीटर उंचीवर मंडीपासून ५० किमी अंतरावर आहे. हा तलाव पराशर ऋषि यांना समर्पित आहे. तसेच एका मातीचा मोठा तुकडा या तलावावर एकीकडून दुसरीकडे तरंगत असतो. याने तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
ऋषि पराशर मंदिर
तलावाच्या बाजूलाच ऋषि पराशर यांचं तीन मजली सुंदर मंदिरही आहे. असे म्हटले जाते की, हे मोठं मंदिर देवदारच्या केवळ एका झाडापासून तयार करण्यात आलं आहे. पण या मंदिरात दर्शन करण्याची संधी केवळ उन्हाळ्यातच मिळते. हे मंदिर किती भव्य आहे याचा अंदाज तुम्हाला इथे आल्यावरच कळेल. मंदिराच्या बाहेरील स्तंभांवर करण्यात आलेली कलाकृती फारच सुंदर आहे.
अॅडव्हेंचरसाठी मोठी संधी
पराशर हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. ट्रॅकर्सची इथे वर्षभर गर्दी बघायला मिळते. खासकरुन हिवाळ्यात इथे ट्रॅकिंग करणे फारच रोमांचक मानलं जातं. यादरम्यान पराशर तलाव पूर्णपणे गोढलेला असतो. इथे एक विश्रामगृह सुद्धा आहे. जिथे थांबून तुम्ही सुंदर डोंगरांचे नजारे बघू शकता.
कधी जाल?
जर तुम्हाला बर्फाने झाकलेला पराशर तलाव बघायचा असेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे येण्याचा प्लॅन करु शकता. त्यावेळी या तलावाचं सौंदर्य डोळ्यातून सामावून घेणारं असतं. एप्रिल ते मे महिन्यातही इथे येऊन तुम्ही एन्जॉय करु शकता. पावसाळ्यात इथे येण्याचा अजिबात विचार करु नका.
कसे पोहोचाल?
विमान मार्गे - भुंतर येथील सर्वात जवळचं विमानतळ आहे.
रेल्वे मार्गे - चंडीगढ येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे. येथून बसने ६ ते ७ तासांचा प्रवास करुन तुम्ही मंडीला पोहोचू शकता. येथूनच पराशरचा ट्रॅक सुरु होतो.
रस्ते मार्गे - जर तुम्ही रस्ते मार्गाने जात असाल तर कुल्लू-मनालीसाठी बस घ्यावी लागेल. ही बस तुम्हाला मंडीला पोहोचवेल. मंडीहून जीपने तुम्ही बागी गावाला पोहोचा. बागीच्या पुढे बसची सुविधा नाहीये. येथून तलावाचं अंतर ७ किमी आहे.