अनेकांना रोमांचक प्रवास करणे पसंत असते. काही रोमांचक जागांवर जाणं किंवा अॅडव्हेंचर अॅक्टिविटी करणे सतत सुरु असतं. ट्रेकिंगची अलिकडे फारच क्रेझ बघायला मिळते. खासकरुन पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण ट्रेकिंगला जाणं कुणाचही काम नाहीये. ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास आणखी चांगला होऊ शकतो.
1) त्या जागेची पूर्ण माहिती घ्या
ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगला जात आहात त्या जागेची पूर्ण माहिती तुम्ही घ्यायला हवी. जेणेकरुन वेळेवर कोणतीही अडचण येणार नाही. या जागेवर आधी जाऊन आलेल्या लोकांकडून किंवा गुगलवरुन त्या ठिकाणाची माहिती मिळवणे कधीही योग्य ठरेल.
2) मानसिकदृष्ट्या तयार रहा
ज्या ठिकाणावर जात आहात त्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तुम्ही तिथे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होणे गरजेचे आहे. जर तुम्ही थंड जागेवर फिरायला जाणार असाल तर आधी मेडिकल चेकअप करुन घ्यावे. अनेकांना उंच ठिकाणांची भीती वाटते पण तरीही त्यांना ट्रेकिंगची आवड असते. अशा लोकांनी मानसिकदृष्ट्या तयार राहणे महत्वाचे आहे.
3) व्यायाम सुरु ठेवा
मानसिक तयारीसोबतच तुम्ही फिजिकली फिट राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी फिरायला जाण्यापूर्वी व्यायाम करा, रनिंग करा. यासोबतच आणखीही काही व्यायाम केल्यास तुम्हाला ट्रेकिंगला जाताना अडचण येणार नाही.
4) सर्व साहित्य सोबत असावे
ट्रेकिंगला निघण्यापूर्वी तुम्ही तुमच्याकडे ट्रेकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य आहेत का हे तपासून बघायला हवे. कारण ट्रेकिंगला जाताना कोणती परिस्थिती समोर येईल हे सांगता येत नाही.
5) नियमांचं करा पालन
बऱ्याचदा उत्साहाच्या भरात काही लोक नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगरावर जाताना किंवा जंगलात काही महत्वाच्या सूचना देणारे बोर्ड लावलेले असतात. ते फॉलो करा.
6) अनावश्यक साहित्य
ट्रेकिंगला जाताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत आवश्यक त्याच वस्तू ठेवाव्या. फार गरजेच्या नसलेल्या वस्तू सोबत ठेवल्यास तुमचं ओझं वाढेल आणि तुम्हाला ट्रेकिंगसाठी अडचणी येतील.
7) एक चांगला मार्गदर्शक सोबत ठेवा
कोणतही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. तुम्हीही ट्रेकिंगला जाण्यापूर्वी एच मार्गदर्शक निवडा. यासाठी तुम्ही सोशल साईट्सचा वापर करु शकता. ट्रेकिंगबाबत सगळी माहिती असलेला व्यक्ती सोबत असल्यास ट्रेकिंग करणे सोपे होईल.