तुम्ही एखाद्या कलात्मक, ऐतिहासिक आणि पारंपारिक ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव नागोरमध्ये घेऊ शकता. येथील किल्ल्याला भेट देऊन तुम्ही एका अविस्मरणीय ट्रिपचा आनंद घेऊ शकता. जोधपुरपासून जवळपास १३७ किमी अंतरावर नागोर आहे. नागोरमध्ये शिरताच येथील सौंदर्य तुम्हाला आकर्षित करेल. येथील सुंदरता इतकी लोकप्रिय आहे की, वर्षभर इथे भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते.
नागोर किल्ला
राजस्थानच्या इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला सुद्धा डोंगराच्या माथ्यावर तयार करण्यात आलाय. या किल्ल्याला नागणा दुर्ग, नाग दुर्ग आणि अहिछत्रपूर दुर्ग या नावांनीही ओळखले जाते. हा किल्ला त्याच्या सुंदर आणि अद्भूत बनावटीसाठी लोकप्रिय आहे. मातीपासून तयार या किल्ल्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. असे म्हटले जाते की, अर्जुनाने हा किल्ला जिंकला होता आणि गुरू द्रोणाचार्यांचा भेट दिला होता.
किल्ल्याची शानदार बनावट
किल्ल्याच्या आत अनेक छोटे छोटे सुंदर महालं आहेत. हाडी राणी, शीश महाल आणि बादल हे तीन महाल त्यांच्या सुंदर बनावटीसाठी जगभराल प्रसिद्ध आहेत. किल्ल्याच्या आत राजपूत शैलीमध्ये तयार करण्यात आलेल्या सैनिकांच्या छत्र्या बघायला मिळतात. सपाट जमिनीवर तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याच्या भींती उंच आहेत आणि परिसरही मोठा आहे. या किल्ल्याला एकूण ६ मोठे दरवाजे आहेत. पहिला दरवाजा लोखंड आणि लाकडाच्या टोकदार खिळ्यांनी मिळून तयार केला आहे.
किल्ल्याची खासियत
नागोरच्या या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्याच्या भींतींवर तोफगोळ्यांचा काहीही प्रभाव पडत नाही.
आणखीही ठिकाणे
नागोर आणि आजूबाजूला फिरण्यासाठी नागोरचा किल्ला, तारकिन दरगाह, मीराबाई यांचं जन्मस्थळ मेडता, कुचामन किल्ला, वीर अमर सिंह राठोड यांची छत्री आणि खिंवसर किल्ला आहे.
कधी जाल?
वर्षभरात तुम्ही कधीही नागोरला जाण्याचा प्लॅन करू शकता. पण महाल फिरण्यासोबतच येथील बहारदार वातावरणाचाही आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही फेब्रवारी ते मे आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान इथे भेट द्या.
कसे जाल?
हवाई मार्ग - जोधपूर हे इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. दिल्ली, जयपूर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून तुम्ही फ्लाइट बुक करू शकता.
रेल्वे मार्ग - दिल्ली, बीकानेर, जयपूर, जोधपूर या शहरातून रेल्वे सुविधा आहे.
रस्ते मार्गे - नागोर बीकानेर, जोधपूर, जयपूर आणि अजमेर या सर्वच मोठ्या शहरांसोबत रस्ते मार्गाने जोडलं गेलं आहे.