प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:56 PM2021-10-04T13:56:06+5:302021-10-04T14:00:21+5:30
मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही.
उस्मानाबाद : जवळपास दीड वर्षानंतर मंदिरांची दारे आता उघडी होत असून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना देवदर्शन घडणार आहे. तुळजापुरातही मंदिर उघडण्यात येत असून, दररोज १५ हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. यामध्ये परराज्यातील भाविक असतील तर त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. लस घेतली नसल्यास त्यांचा ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्यक असणार आहे.
तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या कालावधीत तुळजापुरात लाखो भाविकांची वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशानुसार दररोज पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत १५ हजार भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मात्र, हा प्रवेश केवळ दर्शनासाठी असेल, इतर विधी भाविकांना करता येणार नाहीत. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मल गन असणार आहे. मंदिरात रांगेतील भाविकांनी एकमेकांपासून ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. नवरात्र काळात जिल्ह्यात प्रवेश करताना परराज्यातील भाविकांना किंबहुना अन्य प्रवाशांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा १४ दिवस विलगीकरण पूर्ण केलेले असणे बंधनकारक असणार आहे.
कोजागिरीला तीन दिवस जिल्हाबंदी...
मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नवरात्रीनंतर कोजागिरीला भरणारी तुळजाभवानीची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. कोजागिरी यात्रेला भाविकांची लाखोंच्या संख्येत गर्दी उसळत असते. ही बाब लक्षात घेऊन १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील तीन दिवस राज्यातील तसेच राज्याबाहेरील भाविकांना जिल्हाबंदी असणार आहे. या काळात राज्यातील व राज्याबाहेरील कोणालाही तुळजापुरात प्रवेश मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.