धनबाद: अयोध्येत रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील धनबाद येथे राहणाऱ्या सरस्वतीदेवी (वय ८५ वर्षे) या वयोवृद्ध महिला गेली ३० वर्षांपासून पाळलेल्या मौन व्रताची सांगता करणार आहेत. तब्बल ३० वर्षांपासून त्यांचा आवाज न ऐकलेले कुटुंब त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत.
रामजन्मभूमीवर राम मंदिर उभे राहत नाही तोवर मौन व्रत पाळण्याचा निर्धार सरस्वतीदेवी यांनी केला होता. सरस्वतीदेवी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नवसदेखील केले आहेत. त्यांचे मंदिराबाबतचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. १९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली त्या दिवसापासून त्यांनी मौन व्रत धारण केले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी त्यांचे हे व्रत संपणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्या उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येत मौनी माता म्हणून आहेत प्रसिद्ध
- अयोध्येमध्ये सरस्वतीदेवी मौनी माता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या कुटुंबीयांशी हाताने खाणाखुणा करून संवाद साधतात. काही खूप महत्त्वाचे असेल तर ती गोष्ट त्या लिहून दाखवितात. सरस्वतीदेवी यांनी नंतर मौन व्रतामध्ये काही बदल केला. २०२०पर्यंत त्या दररोज दुपारी एक तास सर्वांशी संवाद साधत असत.
- मात्र, अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिराच्या कामाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा संपूर्ण मौन व्रत आजतागायत स्वीकारले. सरस्वतीदेवींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.