आपण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम बघितला? आपण त्यात एक तरी ओबीसी अथवा एसटी/एससी चेहरा बघितला? त्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि पंतप्रधान होते. मात्र त्यात 73 टक्कांपैकी एकही व्यक्ती नव्हती, असे काँग्रेस नेते तथा खासदा राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते प्रयागराजमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
"हे कसे हिंदू राष्ट्र आहे, ज्यात..."-काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "हे कसे हिंदू राष्ट्र आहे, ज्यात 73 टक्के लोकच नाहीत. तुम्हा लोकांना कधीही या देशाचे कंट्रोल करता येऊ नये, अशी यांची इच्छा आहे. हा देश तुमचा आहे. 73 टक्के लोकांचा आहे."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी दुपारी 4 वाजता येथील स्वराज भवनासमोरून सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबत खुल्या जीपमध्ये काँग्रेसचे उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष अजय राय आणि पक्षाचे इतर नेते होते. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी सांगितले की, राहुल गांधी प्रयागराज विमानतळावरून थेट स्वराज भवनात आले, येथे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि नंतर यात्रेला सुरुवात झाली.
प्रियांका गांधीही होणार सहभागी - पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी (19 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजताच्या सुमारास अमेठीतमध्ये दाखल होईल. येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यात्रेत सहभागी होणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही रायबरेलीमध्ये या यात्रेत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातून राजस्थानच्या दिशेने जाईल.