गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये गुन्हेगारीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञान हल्लेखोरांनी चक्क कोर्टात घुसून वकिलाची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात आणि शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत वकील हे न्यायालयातील त्यांच्या चेंबरमध्ये बसले असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी केबिनमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वकिलांचा जागीच मृत्यू झाला होता.
गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. त्याचवेळी, अज्ञात हल्लेखोरांनी वकिलांच्या चेंबरमध्ये घुसून त्यांच्या डोक्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यानंतर, ते घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेने कोर्ट परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आजुबाजूच्या लोकांकडे घटनेची चौकशी केली. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, गाझियाबातचे डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, दुपारी सव्वा २ वाजता सिहनी गेट पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती मिळाली. मोनू ऊर्फ मनोज चौधरी हे वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. त्यावेळी, दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथही घटनास्थळी रवाना झाले होते. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.