१२ वर्षीय ‘सुजीत’चे टोकाचे पाऊल; विष पिऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 04:00 PM2022-11-18T16:00:54+5:302022-11-18T16:01:23+5:30
उमेद संकल्पकडून श्रद्धांजली : मन हेलावून टाकणारी घटना
वर्धा : अवघ्या १२ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरीच विषप्राशन करून आत्महत्या केली. ही मन हेलावून टाकणारी घटना आगरगाव येथील पारधी वसाहतीत घडली. या घटनेने समाजमन्न सुन्न पडले असून, उमेद संकल्पच्या मंगेशी मून यांनी चिमुकल्याला साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली.
सुजीतला कोरोना काळात उमेद प्रकल्पाद आणले होते. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी गोंधळ घातल्याने त्याला परत आई-वडिलांसोबत पाठविण्यात आले होते. सुजीत व्यसनाच्या आहारी गेला होता. अखेर त्याने आत्महत्येचा पर्याय निवडून स्वत:हाचे जीवनच त्याने संपवून टाकले. अद्यापही त्याच्या आत्महत्येचे कारण पोलिसांना स्पष्ट झालेले नाही.
गेले ते दिवस...राहिल्या फक्त आठवणी
उमेद प्रकल्पातच सुजीतचे लहाणपण गेले. प्रकल्पातील मुलांसोबत त्याने मस्ती केलेली आजही नजरेत आहे. त्यामुळे गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी असे समजून उमेद प्रकल्पाच्या मंगेशी मून यांनी प्रकल्पातर्फे सुजीतला श्रद्धांजली वाहिली.
दोन वर्षांतील चौथी घटना
पारधी वसाहतीत अशा अनेक घटना घडताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दोन वर्षांत ही चौथी घटना आहे. मंगेशी मून यांनी सांगितले की, सुजीतची छोटी भावडं शिक्षणाच्या प्रवाहात यावी यासाठी त्याच्या आईची भेट घेतली. लवकरच त्याची भावडं प्रकल्पात दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.