१५ जुलैनंतर वर्धेत पाणी पेटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:30 PM2019-06-26T22:30:32+5:302019-06-26T22:30:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात सध्या केवळ नाममात्र मृत जलसाठा आहे. या जलसाठ्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्याचा केवळ १५ जुलैपर्यंत नागरिकांना पुरवठा केल्या जाऊ शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वीच पाऊस लांबला गेल्याने आणि आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहत दमदार पाऊस न झाल्यास वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांत पाणी समस्या पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.
महाकाळी येथील धाम प्रकल्पात ३२८.६०० दलघमी पाणी साठविल्या जाऊ शकते. परंतु, मागील दोन वर्षात दमदार पाऊस जिल्ह्यात न झाल्याने हा प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात भरला नाही. शिवाय जेव्हा हा प्रकल्प तयार करण्यात आला तेव्हापासून या प्रकल्पातून एक ट्रॉलीही गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाणी साठवण क्षमता कमीच झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशातच यंदा या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याचा विडा जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाने उचलला असता तरी मागील १ महिना २३ दिवसात केवळ ४० हजार घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पात सुमारे ५ लाख घ.मी. गाळ असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. तर याच प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग करून पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते. मात्र, सध्या स्थितीत या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपला असून सध्या मृत जलसाठ्याची उचल केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाने वर्धा शहर व परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पातील पाणी सोडले होते. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील मृत जलसाठ्यात किमान एक ते दीड मिटरने घट झाल्याचे वास्तव आहे. तर सध्या असलेल्या मृत साठ्यापैकी जास्तीत जास्त ३ दलघमी पाण्याची उचल करता येईल. शिवाय ते पाणी नागरिकांना १५ जुलैपर्यंत देता येईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसात दमदार पाऊस होत धाम नदी दुथडी भरून न वाहिल्यास तसेच धाम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ न झाल्यास जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
गाळ नेण्याकडे शेतकऱ्यांची पाठ
धाम प्रकल्पातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांनी नि:शुल्क न्यावा, असे आवाहन कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. परंतु, सदर गाळ शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आणि तो या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने कुणीही शेतकरी गाळ नेण्यासाठी पसंदी दर्शवित नसल्याचे चित्र या परिसरात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत धाम प्रकल्प गाळमुक्त करून या भागातील शेतशिवार गाळयुक्त करावे, अशी मागणी आहे.