१५ लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त
By admin | Published: May 12, 2014 12:03 AM2014-05-12T00:03:40+5:302014-05-12T00:03:40+5:30
येथील वणा नदी लगतच्या शितला माता मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून पडून असलेला जवळपास १५ लाख रुपयांचा अवैध रेती साठा तहसीलदार दीपक करंडे यांनी जप्त केला़
हिंगणघाट : येथील वणा नदी लगतच्या शितला माता मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून पडून असलेला जवळपास १५ लाख रुपयांचा अवैध रेती साठा तहसीलदार दीपक करंडे यांनी जप्त केला़ हा साठा तहसील कार्यालय परिसरात हलविण्यात येत आहे. वणा नदीच्या अनेक रेती घाटांचे लिलाव झाले आहेत़ पावसाळा आता दीड महिन्यांवर असल्याने नियमीत विक्री सोबतच रेतीची साठवणूक करण्यात येत आहे़ सदर प्रकार दरवर्षीचा असून पावसाळ्यात हाच रेतीसाठा दुपटीने विकला जातो. याची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांना मिळाली़ यामुळे सदर अवैध रेती साठ्याबाबत त्यांनी ३ मे रोजी जाहीरनामा काढून मालकी हक्क सिद्ध करण्याचे आवाहन केले होते; पण कुणीही या रेती साठ्याची मालकी दर्शविली नाही. यामुळे शनिवारपासून सदर रेतीसाठा जेसीबीच्या साह्याने ४ टिप्परमध्ये भरून तहसील कार्यालय परिसरात हलविण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हा अवैध रेती साठा जवळपास ५०० ते ६०० ब्रास असण्याची शक्यता तहसीलदार करंडे यांनी वर्तविली आहे़ सदर साठा जागीच ठेवल्यास चोरी जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे़ रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १६ टिप्पर रेतीसाठा हलविण्यात आला होता़ रात्रीही रेतीची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ सदर कारवाई तहसीलदार दीपक करंडे, मंडळ अधिकारी आर.टी़ उके, व्ही.एच. उके, तलाठी नकोरीया, दाते, पाचखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक साबळे व शिपाई विनोद भाडे यांच्या उपस्थितीत सुरू आहे. या कारवाईमुळे रेती चोरी व रेतीची अवैध साठवणूक यावर आळा बसण्याची अपेक्षा तहसीलदार करंडे यांनी व्यक्त केली आहे़ पावसाळा लागणार असल्याने माफीया रेतीची साठवणूक करण्याच्या कामी लागले आहेत़ यामुळे तालुक्यात आणखी काही ठिकाणी कारवाईची शक्यताही तहसील कार्यालयामार्फत वर्तविली जात आहे़(तालुका प्रतिनिधी)