लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दिवाळीचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मुळगावी परतले. याच काळात कोविड टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढेल अशी आशा होती. पण अनेक व्यक्ती कोरोना काळातील खबरदारीचे उपायांची अंमलबजावणी करीत वर्धा जिल्ह्यात परतल्याने १ ते १८ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यात केवळ ११ हजार ९३४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या दिवसांत कोविड चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढेल असे गृहीत धरून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळी केवळ ८४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली होती. जिल्ह्यात सध्या ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कोरोनाशी लढा दिला जात आहे.असे असले तरी याच १८ दिवसांच्या काळात कोरोनाने जिल्ह्यातील १५ व्यक्तींचा बळी घेतला आहे. यात १४ पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या १८ दिवसांत ११ हजार ९३४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ८३१ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविड बाधितांमध्ये ५१६ पुरुष तर ३१५ स्त्री कोविड बाधितांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग सध्या पुरुषांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुण आणि वृद्ध पुरुषांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
टेस्टींग सेंटरवर होती संशयितांची कमी-अधिक गर्दी
दिवाळीच्या निमित्ताने मुळ गावी परतल्यावर बदललेल्या वातावरणाचा अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम पडला. यात काहींना ताप, सर्दी, खोकला झाल्याने त्यांनी जिल्ह्यातील कोविड टेस्टींग सेंटरवर जात कोविड चाचणी केली.
कोविड टेस्टींग सेंटरवर नागरिकांची गर्दी वाढू शकते अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे या सेंटरवर अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत होते. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याबाबत सूचनाही दिल्या जात होत्या.