आंदोलनांचा परिणाम : कामगारांना मिळाला न्यायवर्धा : कंत्राटी व आऊटसोर्सिंग तसेच सुरक्षा रक्षक कर्मचारी संघटनेद्वारे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची फलश्रूती झाली असून १८ सुरक्षा रक्षकांना कामावर घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कामगारांना न्याय मिळाला आहे.कंत्राटी, आऊटसोर्सींग व सुरक्षा रक्षक कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तत्सम पत्र सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर यांना दिले होते. या पत्राची दखल घेत सुरक्षा रक्षक मंडळाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी सहायक आयुक्त बेलेकर यांनी चर्चेस बोलविले. या चर्चेत महावितरण वर्धा येथील कार्यकारी अभियंता लिलाधर सदावर्ती, सुरक्षा रक्षक मंडळातर्फे लोखंडे, बेलेकर, मारोडकर व संघटनेचे पदाधिकारी दिलीप उटाणे, श्याम काळे, वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा, सुरेश गोसावी, साहेब मून, भालचंद्र म्हैसकर, मोहन चौधरी, शालिक इवनाथे उपस्थित होते. यात आर्वी विभागातील अपात्र ठरविलेल्या १८ सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे ठरले. यानंतर वर्धा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांवर अन्याय होणार नाही, असे सांगून लेखी पत्र देण्यात आले. शिवाय सुरक्षा रक्षक मंडळाचे संपूर्ण फायदे देण्याचेही सांगण्यात आले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना सोमवारी दोन्ही पत्र देत अन्यायाची माहिती दिली. न्याय मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.(स्थानिक प्रतिनिधी)
१८ सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेणार
By admin | Published: June 11, 2015 2:04 AM