टोकणधारक २,१७४ शेतकऱ्यांनी अल्पदरात विकले पांढरे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:45+5:30
शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कापसाचे किती उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा अंदाज यंदा चुकल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन गृहभेटी घेऊन जिल्ह्यातील शेतकºयांच्या घरी अंदाजे किती कापूस शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ७९२ शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन पाहणी केली असता सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या टोकण धारक २ हजार १७४ शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात पांढरेसोने विकल्याचे पुढे आले आहे. एकूणच कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजाचा जिल्ह्यातील बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील एकूण ५० हजार ८८५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे त्यांनी उत्पादीत केलेले पांढरेसोने विक्री करण्यासाठी नोंदणी करून टोकण प्राप्त केले. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अजूनही सीसीआय किंवा कापूस पणन महासंघाकडे विकल्या न गेल्याचा फुगीव आकडा जिल्ह्यात कायम असल्याने वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस शिल्लक आहे काय या बाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार असले तरी आतापर्यंत टोकण धारक २,१७४ शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस न विकता थेट खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात कापूस विकल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदणी सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
कृषी अधीक्षक कुंभकर्णी झोपेतच?
शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.
सर्वेक्षणात हिंगणघाट तालुका अव्वल
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ७९२ शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कापूस विकला किंवा विकण्याचे शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील ३ हजार ३००, समुद्रपूर १ हजार ६४०, वर्धा २ हजार ५४९, देवळी १ हजार ५५, कारंजा (घा.) ७०६, आर्वी ७१०, सेलू २ हजार ७ तर आष्टी तालुक्यातील ८२५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जात नाही. त्यामुळे त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला. सरकारने अशा मस्तवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावत विचारणा केली पाहिजे. शिवाय त्यांची तातडीने बदली केली पाहिजे; पण मुख्यमंत्रीच सध्या पावरहीन आहेत.
- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य, शेतकरी आत्महत्याग्रस्त समिती, वर्धा.