आॅनलाईन लोकमतवर्धा : येत्या काही दिवसानंतर इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांकडून केल्या जाणार आहे. या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच परिसरात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतूने सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर रविवारी सकाळी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल करीत गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.सावंगी पोलिसांनी पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून दारूविक्रेत्यांनी जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेऊन तो जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केला. शिवाय दारूगाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोह रसायन सडव्यात टाकण्यात येणारा गुळ, प्लास्टिकचे ड्रम, लोखंडी ड्रम, गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत मिलिंद पारडकर, प्रकाश निमजे, राजू उराडे, प्रकाश धोटे, राजू चाटे, नाना कौरती, रंजना पेटकर आदींनी केली.तीन दारूविक्रेत्यांना अटकपांढरकवडा पारधी बेड्यावर रविवारी सकाळी राबविण्यात आलेल्या वॉश आऊट मोहिमदरम्यान सावंगी पोलिसांनी इंद्रपाल भोसले, सचिता सचिन पवार, सज्जनवार पवार व धनपाल मारवाडे सर्व रा. पांढरकवडा पारधी बेडा या दारूविक्रेत्यांविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. इंद्रपाल भोसले वगळता इतर तीन दारूविक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दारूबंदीची अंमलबजावणी सध्या केली जात आहे.दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. परिसरात कुठेही दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्यास त्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी.- संतोष शेगावकर, ठाणेदार, पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे).
गावठी दारूसह २.४० लाखांचे दारूगाळण्याचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:01 PM
येत्या काही दिवसानंतर इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांकडून केल्या जाणार आहे.
ठळक मुद्देसावंगी पोलिसांची कारवाई : पांढरकवडा पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम