तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:50 PM2018-01-15T22:50:35+5:302018-01-15T22:51:37+5:30
अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला.
रूपेश खैरी।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला. या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील तीन वर्षातील अपघातांचा सर्व्हे करून अपघात प्रवणस्थळ निवडण्यात आले. वर्धा जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर तब्बल ३६ ब्लॅकस्पॉट असल्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅकस्पॉट वर्धा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. दुसºया क्रमांकावर हिंगणघाट तालुका आहे. या तालुक्यातून दोन महामार्ग गेल्याने अपघात प्रवणस्थळांची संख्या अधिक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली. तर तिसºया क्रमांकावर देवळी तालुका असून येथे दोन ठिकाण ब्लॅकस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली.
केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले आहे. या सर्वेक्षणानुसार अधिकाधिक अपघात होणाºया ठिकाणी कुठल्या दुरूस्तीमुळे अपघाताची तीव्रता कमी करण्यात येईल, याबाबतचा अहवाल सार्वजिनक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅकस्पॉट निवड करण्यात किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूचा सरासरी विचार करून त्याच स्थळांना ब्लॅकस्पॉट घोषित करायचे की नाही हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांचा स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्याठिकाणी झालेली जीवितहानी याचा अभ्यास करून विशेष स्थळे निवडण्यात आले. ही स्थळे निवडल्यानंतर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरूस्त्या सुचविण्यात आले आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तसेच तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.
तीन वर्षांच्या अपघातांवरून अपघातप्रवण स्थळांची निवड
जिल्ह्यात बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवणस्थळ असे फलक लावण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना तीन वर्षातील अपघाताचा विचार करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे अशी ठिकाणे नकाशावर नोंद करण्याच्या उद्देशाने हा सर्व्हे करण्यात आला असावा, असा अंदाज अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.
गुगल मॅपवर दर्शविणार ब्लॅकस्पॉट
प्रवासादरम्यान बहुतांश चालकांकडून गुगल मॅपचा वापर केला जातो. वाहनामध्ये जिपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅकस्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मिटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात टाळणे शक्य आहे. यासाठी ब्लॅकस्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.
अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना
अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काही उपाययोजना सूचविल्या आहे. त्या उपाययोजना बांधकाम विभागाला पूर्ण करावयाचे आहे. यात सिग्नल बोर्ड, स्पीड ब्रे्रकर, रस्ता दुभाजक, फुटलेले रस्ता दुभाजक पूर्ण करणे यासारख्या उपाययोजना सुचविल्या आहे.
महत्त्वाचे १२ ब्लॅकस्पॉट व तीन वर्षात झालेले मोठे अपघात
जाम चौरस्ता, समुद्रपूर- १०
नंदोरी फाटा, हिंगणघाट - १०
आजंती शिवार, हिंगणघाट - १०
नांदगाव चौक, हिंगणघाट - १४
महाबळा शिवार, सेलू - ०८
बरबडी बसस्थानक, सिंदी (रे.)- ०८
देवळी नाका, वर्धा - ०४
शिवाजी चौक वर्धा - ०६
बजाज चौक, वर्धा - ०७
जुनापाणी चौक, वर्धा - ०७
इसापूर शिवार, देवळी - ०७
खर्डा शिवार, देवळी - ०७