वर्धा जिल्ह्यात ३,६२८ गोवंशाला ‘लम्पी स्कीन डिसीज’ संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 09:50 PM2020-09-02T21:50:50+5:302020-09-02T21:51:35+5:30
वर्धा जिल्ह्यात मनुष्यांवर कोविड-१९ विषाणू अटॅक करीत असताना गोवशांना ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मनुष्यांवर कोविड-१९ विषाणू अटॅक करीत असताना गोवशांना ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे. जिल्ह्यात ३ हजार ६२८ लम्पी स्कीन डिसीज बाधित जनावरांची नोंद आतापर्यंत घेण्यात आली असून त्यापैकी २ हजार ५१८ जनावरांनी त्यावर मात केली आहे. तर सध्यास्थितीत १ हजार ११० अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या त्वचेवर छोट्या छोट्या गाठी येतात. अशातच जनावर अन्नपाणी सेवन करण्याचे सोडते. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे. पशूवैद्यकीय विभागाने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात केवळ गोवंशातच या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गोपालकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस असलेली ‘गोट फॉक्स व्हॅक्सीन’ टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जनावराच्या नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. ताप येतो. दुध उत्पादन कमी होते. त्वचेवर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. बहूदा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होते.
उपचारासाठी तीन दिवस महत्त्वाचे
‘लम्पी स्कीन डिसीज’ची लागण झालेल्या जनावराला वेळीच औषधोपचार मिळाल्यास त्या जनावराला जीवदान मिळू शकते. त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर छोट्या छोट्या गाठी आढळून आल्यास किंवा त्याचे लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी आपल्या जनावराला वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन औषधोपचार करावा. औषधोपचार सुरू असलेल्या लम्पी स्कीन डिसीज बाधित गाय वर्गीय जनावरासाठी उपचार सुरू असलेले तीन दिवस महत्त्वाचे राहत असल्याचे पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
उपायुक्त कार्यालयाला शासनाने दिला लाखाचा निधी
जिल्ह्यात एकूण २ लाख २५ हजार १८९ गोवंश असून आतापर्यंत ३ हजार ६२८ गाय वंशातील जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा संसर्ग झाल्याची नोंद प्रशासनाने घेतला आहे. या विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर शासनाकडून एक लाखाचा निधी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला प्राप्त झाला आहे. वेळप्रसंगी हा निधी जिल्ह्याला ‘लम्पी स्कीन डिसीज’मुक्त करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य आजार आहे. जिल्ह्यात या आजाराची आतापर्यंत ३,६२८ गोवंशांना लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा विषाणूजन्य आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांना नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्रतिबंधात्मक लस द्यावी.
- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वर्धा.