पालिका संग्रामात ८७० उमेदवार

By admin | Published: November 13, 2016 12:39 AM2016-11-13T00:39:17+5:302016-11-13T00:39:17+5:30

येत्या २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहा पालिका निवडणुकीतील उमेदवारांची शनिवारी

870 candidates in municipal contest | पालिका संग्रामात ८७० उमेदवार

पालिका संग्रामात ८७० उमेदवार

Next

सहा नगराध्यक्षपदासाठी ५५ जण : नगरसेवक पदासाठी ८१५ जण रिंगणात
वर्धा : येत्या २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहा पालिका निवडणुकीतील उमेदवारांची शनिवारी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. सहाही पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी ५५ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. तर नगरसेवक पदासाठी ८१५ इतके उमेदवार दंड थोपटून निवडणुकीच्या रणांगणात सज्ज झाले आहेत. नगराध्यक्षसह नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे काहींनी बंडाळीचे निशानही फडकाविले आहे. यामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
वर्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १४ जण रिंगणात उभे ठाकले आहे. यामध्ये चंदशेखर पांडुरंग खडसे( राकाँ), डॉ. गणेश प्रल्हाद जवादे(बसपा), अतुल मोतीराम तराळे (भाजप), राजेंद्र इंद्रकुमार सराफ (शिवसेना), प्रवीण कृष्णराव हिवरे(कॉग्रेस) व अशोक दशरथ मेश्राम(रिपाइं) यांच्यासह अपक्षांमध्ये नरेंद्र कृष्णराव गुजर, मोहन विष्णू चौधरी, सुरेश रामराव ठाकरे, तुषार भाऊराव देवढे, आशिष राधेश्याम पुरोहित, सुधीर भाऊराव पांगुळ, सुरेश निळकंठ रंगारी, रवींद्र मनोहरचंद साहू या उमेदवारांचा समावेश आहेत. वर्धेत नगरसेवक पदाच्या ३८ जागांसाठी तब्बल १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
पुलगावात नगराध्यक्ष पदाचे १२ तर नगरसेवक पदासाठी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. नगरारध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रंजना चंद्रकांत पवार, भाजपाच्या शीतल संजय गाते, शिवसेनेच्या कविता सुनील ब्राह्मणकर, बसपाच्या वर्षा कुंदन जांभुळकर, राकाँच्या वैशाली श्यामसुंदर देशमुखसह संगीता रामटेके, सारिका कादी, नंदा चौधरी, पुष्पा हरडे, परवीन गुलाब खान, सुनीता मोहोड व शकुंतला गावंडे हे अपक्ष उमेदवार भाग्य अजमाविणार आहेत.
हिंगणघाटात मातब्बरांनी कंबर कसली आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवक पदासाठी २७३ उमेदवार रिंगणात दंड थोपटून आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये काँगे्रसचे माजी नगराध्यक्ष पंढरी हरिभाऊ कापसे, राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार तथा विद्यमान नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, शिवसेनेचे राजेंद्र खुपसरे, भाजपाचे पे्रम बसंतानी, बसपाचे मोहंमद रफीक पीर मोहंमद तर अपक्षांमध्ये राजेंद्र नत्थूजी कामडी, कामगार नेते श्रावण नारायण ढगे, उमेश सदाशिव नेवारे, सिताराम भुते, माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार गिरधर राठी, श्याम भास्कर ईडपवार, कमला विनायक कुंभारे यांचा समावेश आहे. पक्षातील उमेदवारांना अपक्ष आणि बंडखोर आव्हान देणारेच ठरणार असल्याचे दिसते.
आर्वीत नगराध्यक्ष पदाकरिता सात तर नगरसेवक पदाकरिता ९३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेनेकडून डॉ. मंजूषा शैलेश अग्रवाल, काँगे्रसकडून लता प्रभाकर तळेकर, भाजपाकडून प्रशांत मधुकर सव्वालाखे तर अपक्षांमध्ये वासुदेव महादेव गोधने, अ‍ॅड. प्रकाश कृष्णराव भुसारी, संजय नामदेव राऊत आणि संजय अंबादास वानखेडे यांचा समावेश आहे.
सिंदी रेल्वे येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे सात तर नगरसेवक पदाकरिता ८६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांत काँगे्रसच्या शोभा बबन ढोक, राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रणाली अमोल ढोक, भाजपाच्या संगीता सुनील शेंडे, शिवसेनेच्या दुर्गा प्रफूल कांबळे, बसपाच्या प्रणाली अरविंद बुचुंडे तर अपक्षांमध्ये ललिता कमलाकर फुलकर, मिरा गणेश बर्जे यांचा समावेश आहे. देवळीत नगराध्यक्ष पदाचे तीन तर नगर सेवक पदाचे ६१ उमेदवार रिंगणात आहेत. यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या सुचिता रमेश मडावी, काँगे्रसचे जनार्दन राजेराम पंधरे आणि शिवसेनेचे निलेश तरपते यांचा समावेश आहे. नगर सेवक पदासाठी भाजपा, काँग्रेस व शिवसेना या पक्षाचे प्रत्येकी १७, बसपा ३ आणि ७ अपक्षांचा समावेश आहे. चिन्ह वाटपात भाजपा कमळ, काँग्रेस हाथ, शिवसेना धनुष्यबान, बसपा हत्ती तसेच अपक्षांना कपबशी व गॅससिलिंडर या चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. भाजपाच्या विद्यमान नगरसेविका मंदा सातपुते यांचे पती शरद सातपुते यांनी प्रभाग क्र. ६ ब मधून अपक्ष नामांकन दाखल करीत बंडखोरी केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

सिंदी(रेल्वे) पालिकेत चिन्ह वाटपावरुन गोंधळ
सिंदी(रेल्वे) : नगर पालिका अध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होता. सिंदी नगर पालिकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवारांना दिलेले निवडणूक चिन्ह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनाही वाटप केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला दिलेले निवडणूक चिन्ह अपक्ष उमेदवाराला द्यायचे नाही, असे आदेश होते. ही बाब निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या उशिराने लक्षात येताच त्यांनी अपक्ष उमेदवारांना बोलावून त्यांना वाटप केलेले चिन्ह रद्द केले. यामुळे अपक्ष उमेदवारांनी दिलेले चिन्ह कायम ठेवा, असा रेटा लावून संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.
यामुळे एकंदर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, निवडणूक अधिकारी राठोड यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्या पुन्हा कर्तव्यावर सक्रिय झाल्या. मात्र अपक्षांचा रेटा सुरूच होता. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघाला नसताना निवडणूक अधिकारी राठोड कार्यालयातून बाहेर निघून गेल्या. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी उमेदवारांना चिन्ह जाहीर केले. मात्र हे चिन्ह मान्य नसल्याची तक्रार उमेदवारांनी मुख्याधिकाऱ्यांकडे रात्री उशिरा केली. तसेच या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 870 candidates in municipal contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.