वर्धेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक
By admin | Published: June 3, 2017 12:27 AM2017-06-03T00:27:00+5:302017-06-03T00:27:00+5:30
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढताना दिसला.
शेतकरी संपाचा दुसरा दिवस : शेतकऱ्यांकडून वाढत्या प्रतिसादाने संप भडकला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढताना दिसला. यामुळे हे आंदोलन चांगलेच भडकत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत आज दूध उत्पादकांनी बजाज चौक परिसरात शासन विरोधी नारे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला. तर आष्टी तालुक्यात स्वाभीमानी शेतकरी संघटना तर तळेगाव येथे शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर भाजीपाला टाकत निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात वर्धेत सहभागी होत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी केवळ काही दूध उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून निषेध नोंदविला. तर हिंगणघाट व आष्टीत निवेदन देत या संपात सहभागी होत असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला दिला. सर्वत्र सुरू असलेल्या संपात आज अनेक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपला रोष व्यक्त केला.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खडकी सिरसोली चौक परिसरात एकत्र येत आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रमुख आशिष वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजी, कांदा व दूध फेकत निषेध नोंदविला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, उत्पादनाच्या दीडपट खर्च मिळण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे तालुका प्रमुख पवन नागपूरे यांची उपस्थिती होती. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राष्ट्रीय महामार्गावर वळला. तळेगाव येथे पोहोचत शेतकऱ्यांनी मुख्यमार्गावर भाजीपाला टाकत निषेध नोंदविला. येथे शिवसेनेनेही आंदोलन केले. येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
बजाज चौकात दूध उत्पादकांचे आंदोलन
शेतकरी संपादरम्यान वर्धेतील दूध उतपाकांकडून संपाच्या सातही दिवसात दूध रस्त्यावर टाकण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. गुरुवारी या दूध उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. तर आज बजाज चौक परिसरात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक करीत आंदोलन केले. यावेळी मंत्र म्हणून शासनाविरोधी नारे त्यांच्याकडून देण्यात आले. या आंदोलनात भूगाव, तळेगाव (टालाटुले) येथील दूध उत्पादकाचा समावेश होता.