वर्ध्यात राज्य परिहवन मंडळाच्या विभाग नियंत्रकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:42 PM2018-10-13T15:42:16+5:302018-10-13T15:46:09+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. हा प्रकार आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत शनिवारी सदर तरुण-तरुणींनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात रापमच्या विभाग नियंत्रकांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनीआंदोलन मागे घेतले.
रापमच्या वर्धा विभागाच्या अधिकारात येणाऱ्या कार्यशाळेत सुमारे ६१ तरुण-तरुणी शिकाऊ उमेदवार म्हणून विविध विषयांचे प्रशिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर या तरुणांना सरकारच्यावतीने सुमारे ७ हजार ७६३ रुपये मानधन दिले जाते. परंतु, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या मानधनातून रापमच्या वर्धा विभागाच्यावतीने प्रोफेशनल टॅक्सचे कारण पुढे करीत चक्क १७५ रुपयांची कपात करण्यात आली. हा प्रकार काही तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी रापमच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देत थेट सीआर खराब करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सदर तरुण-तरुणींनी आपली समस्या युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्याकडे मांडली. त्यावर निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात सदर शिकाऊ उमेदवारांनी शनिवारी रापमच्या वर्धा विभाग नियंत्रक कार्यालय गाठले. शिवाय विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्या दालनात ठिय्या देत आपली समस्या मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
कपात करणारा वर्धा विभाग एकमेव
शिकाऊ उमेदवारांना देण्यात येणाऱ्या मानधनातून प्रोफेशनल टॅक्सच्या नावाखाली कपात केवळ वर्धा विभागातच करण्यात आली आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा या विभागात कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येत नसून हा आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत सदर कपात तात्काळ मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून लावली होती.
महिला अधिकाऱ्याकडून सीआर खराब करण्याची धमकी
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातून करण्यात आलेल्या कपातीबाबत सदर काही शिकाऊ तरुण-तरुणींनी रापमच्या डीपीओ करिष्मा शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे त्याबाबतची लेखी नियमावली आहे. तुम्ही जास्त दबाब आणल्यास किंवा कुठलेही आंदोलन केल्यास तुमचा सीआर खराब करू अशी धमकी दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याची चौकशी करून सदर महिला अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली.
परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती
ज्यांची नियुक्ती ज्या महिन्यात झाली त्या महिन्याचा आधार घेत परीक्षा घेतली जाईल असे रापमच्या अधिकाऱ्यांच्यावतीने तोंडी सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी रापमच्या विभाग नियंत्रकांनी योग्य पाऊल उचलावेत असेही यावेळी सदर शिकाऊ उमेदवारांनी सांगितले.
मानधनातून होणाऱ्या कपातीची माहिती आपल्याला आजच मिळाली. त्या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून विचारणा केली असता आम्हाला आमची चूक लक्षात आली आहे. त्यामुळे यापूढे ही कपात होणार नाही. शिवाय कपात झालेली रक्कम येत्या दहा दिवसात सदर शिकाऊ उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करू. इतकेच नव्हे तर कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहो. तर ज्या महिला अधिकाऱ्याने सीआर खराब करण्याची धमकी दिली त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच चौकशी करून सदर प्रकारातील जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.