वर्धा : लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित झाली असताना आणि भाजपचा उमेदवार ठरला असतानाही महाविकास आघाडीतील उमदेवारीचा तिढा कायम आहे. एवढेच नव्हे, तर आघाडीतील नक्की कोणत्या पक्षाचा उमेदवार लढणार, ही बाबही गुलदस्त्याच आहे. त्यामुळे आघाडीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
येत्या २६ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नाही. महाविकास आघाडीत वर्धा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील वर्धेची एकमेव जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांचे उमेदवारीवरून घोडे अडले आहे. सुरूवातीला अमरावती जिल्ह्यातील माजी मंत्री रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनीच माघार घेतल्याचेही सांगण्यात आले. मात्र, १९ मार्चला पुन्हा त्यांनी चांदूर परिसरात भेटीगाठी सुरू केल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुंबईत खलबते सुरू आहे. अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. अमरावती, नागपूरसह वर्धा जिल्ह्यातील इच्छूक राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात घालून बसले असताना काँग्रेसच्या माजी आमदारांनीही ‘साहेबां’ची भेट घेतली आहे. त्यांना राष्ट्रवादीने ‘तुतारी’वर लढण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तुतारी की पंजा, अशा पेचात ते सापडले आहे. त्यामुळे त्यांनी विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी अद्याप तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. हा गुंता २८ मार्चपूर्वी सुटण्याची शक्यता आहे.
अद्याप उमेदवारी नक्की झाली नसताना काही इच्छूक आपल्या स्टेटसवर नेत्यांसोबतचे छायाचित्र ठेवून आपल्याल्याच उमेदवारी मिळाल्याची आवई उठवीत आहे. यातून त्यांची खदखद दिसून येत आहे. काहींनी नेत्यांसोबतचे छायाचित्र आपल्या समर्थकांना पाठवून व्हायरल केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून आणखी संभ्रम निर्माण होत आहे. निवडणुकीची अधिसूचना निघण्याची वेळ जवळ आली असताना आघाडीचा पक्ष आणि उमेदवार ठरत नसल्याने ‘हाता’ने तुतारी नक्की कोण वाजवीणार, अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आम्ही आघाडीच्या उमेदवारामागे
महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आम्ही आघाडीच्या उमेदवारामागे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही देत आहे. आघाडीकडून जो उमेदवार असेल, त्याच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवार ठरत नसल्याने त्यांनाही चिंता सतावत आहे. ऐनवेळी उमेदवार घोषित झाल्यानंतर प्रचारासाठी मोजकाच अवधी मिळणार आहे. त्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.