वर्धा: वर्धा लोकसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे राहावी, यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा राकाँला निश्चित झाली, असे कळाल्याबरोबर अमर काळे यांनी आपली भूमिका मांडत स्वयंभू उमेदवार म्हणून तुतारी हाती घेण्यासाठी वेगळी चूल मांडली. मात्र, एका पक्षात राहताना दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढविता येत नाही. या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असून काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित आहे, असे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
अग्रवाल पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी अनेकदा त्यांना काँग्रेस पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी विधानसभेची तयारी नसताना लोकसभा कशी लढावी, असे म्हणून नकार दिला होता. वर्धा लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहण्यासाठी मुंबई, दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे आम्ही साकडे घातले होते. तेव्हाही काळे यांना विचारण्यात आले होते. मात्र, तेव्हाही त्यांनी नकार दिला. काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे कारण त्यांनी सांगितले होते. मात्र, जागा राकाँला सुटल्याचे कळताच त्यांनी पटकन उडी मारली. आता ते राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगत आहे. कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी असताना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याचा गाजावाजा करीत आहे. असे करणे पक्षनियमांच्या विरुद्ध आहे. त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नितेश कराळे यांची उपस्थिती होती.
सत्ता बदल व्हावा, असे प्रस्थापितांना वाटत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासंदर्भात शरदचंद्र पवार यांची मी भेट घेतली. ही जागा मिळणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने काम केले. मात्र, अमर काळे यांच्याकडून रहस्यमय पद्धतीने नात्यांचा वापर करून जागा नावावर करण्याचे प्रयत्न केले जात आहे, असा आरोप नितेश कराळे यांनी केला. सत्ता बदल व्हावा, असे सर्वसामान्यांना वाटते. मात्र, प्रस्थापितांना तसे वाटत नाही. त्यांना कायम कार्यकर्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी केवळ सतरंज्या उचलाव्या, असेच वाटत असल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला. या संदर्भात वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेत्यांची परवानगी घेऊनच मैदानात - काळेवर्धा लोकसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे राहावी, यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील हाेतो. वरिष्ठ स्तरावर प्रयत्नही केले. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. त्यामुळे राष्ट्रवादीनेच मला उमेदवारीची ऑफर दिली. काँग्रेस पक्ष, सर्व वरिष्ठ नेते, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी विचार करूनच मी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास तयारी दर्शविली, असे अमर काळे यांनी सांगितले. शैलेश अग्रवाल, नितेश कराळे हे माझे कनिष्ठ बंधू असून, त्यांना माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले, तसेच त्यांची नाराजी दूर सारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अमर काळे म्हणाले, निवडणूक लढण्यासाठी आर्थिक बाबींबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही कळविले आहे. दरम्यान, शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसकडून, तर नितेश कराळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेही उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार असून, काँग्रेसकडे माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी मागणी करण्याचाही अधिकार असल्याचे काळे यांनी सांगितले.