निर्मलादेवी एस. यांची माहिती : बसमधून महिलांचे साहित्य लांबविणारी टोळी जेरबंद लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांतून महिलांचे दागिने लांबविणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून आतापर्यंत १३ गुन्हे उघड झाले असून त्यातील ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी आयोजित पत्रकार परिषदेत वर्तविली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची उपस्थिती होती. अशा चोऱ्यांचे जिल्ह्यात तब्बल ३३ गुन्हे नोंद झाले आहेत. यातील १३ गुन्हे उघड झाले आहे. यात हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत १०, देवळी, सेलू व वाशिम पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहुलसिंग शंकरलाल (३१), सोनुकुमार हरीओमबाबु (२७), महंमद युसुफ लालसहाय (४५), महंमद गुलशेर अब्दुल्ला (४६), सलीम जब्बार (५०), केशव बहोदीलाल देव (३८), नसीर रशीद (२०), रशीद शहजाद (६०), मनोज नत्थुलाल (२५) यांच्याकडून प्रारंभी ५७.५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख २५ हजार ७४६ रुपये जप्त करण्यात आले. त्यांच्यावर हिंगणघाट ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोटडी दरम्यान या टोळीला घेवून हिंगणघाट व स्थानिक गुन्हे शाखेची चमू अलीगड, उत्तर प्रदेश येथे रवाना झाली. या दोन्ही चमूने केलेल्या तपासात या चोरट्यांकडून मुद्देमाल स्विकारणारा सोनार कुलदिप रामकिशोर वर्मा रा. अलिगड, उत्तरप्रदेश याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीतील ८ लाख ५० हजार रुपयांचे एकूण ३०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी दिली. या प्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, हिंगणघाटचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, एलसीबीचे उपनिरीक्षक आचल मलकापूरे, हिंगणघाट ठाण्याचे उपनिरीक्षक मोरखडे, जमादार निरंजन वरभे यांच्यासह पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
‘त्या’ टोळीकडून ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: June 02, 2017 2:02 AM