जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींचा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:32+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा नवीन कार्यक्रम आला आहे. जिल्ह्यात झालेल्या १ हजार ७६ कि.मी. मधील जुन्या आणि खराब रस्त्यांचे आराखडे खासदार आणि आमदार यांच्या मान्यतेने तयार करून मंजुरीसाठी पाठवावेत. जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अनेक गावांत बस जात नाही आणि त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी असणाऱ्या पांदण रस्त्यांचा विषय आमदार डॉ. पंकज भोयर पालकमंत्री पांदण रस्ते समितीसमोर ठेवला. त्यावर समितीने या आराखड्यास मंजुरी दिली. तसेच यासाठी १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. सोबतच पुढील १५ दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्ते दुरुस्त करावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी बांधकाम विभागाला दिलेत.
जिल्हा परिषद व नगर परिषदेअंतर्गत झालेल्या पाच वर्षांतील कामांचे परीक्षण करण्यासाठी चमू पाठविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, धरणांची पाणी पातळी, पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेली मनुष्यहानी, घर, जनावरे आदींचे नुकसान आणि दिलेले आर्थिक सहाय्य याबाबत माहिती दिली. शिवाय यावर्षी खरिपाच्या लागवड क्षेत्रात १६ हजार हेक्टरने वाढ झाल्याचेही सांगितले. यात बैठकीला जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.