वर्धा : भारतीय जनता पक्षाने गुरुवार, १४ मार्चला लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली. लागोपाठ तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित होताच तडस यांच्या समर्थकांनी जल्लोष केला, तर पक्षांतर्गत विरोधकांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपल्या उमेदवाराची घोषणा करून पहिल्या टप्प्यात विरोधी महाविकास आघाडीवर मात केली केली. भाजपाने सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे तडस यांच्यासमोर विजयाची हॅटट्रिक साधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विरोधकांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले असताना पक्षांतर्गत धुसफुसीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याचे संकेत मिळत आहे. तडस यांना उमेदवारी घोषित होताच भाजप उमेदवारीच्या शर्यतीत असलेले त्यांचे पक्षांतर्गत विरोधक खदखद व्यक्त करीत आहे.
गेल्या १० वर्षांपासून रामदास तडस खासदार असल्याने काही प्रमाणात पक्षातच त्यांच्याविषयी नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. भाजपच्या एका माजी खासदाराने थेट माध्यमांसमोरच तडस यांच्याप्रती नाराजी व्यक्त केली. तडस दुसऱ्या पक्षातून आले, त्यांच्या कार्यकाळात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना जास्त वाव मिळतो, असा थेट आरोपच त्यांनी केला. शर्यतीतील एका दुसऱ्या इच्छुकाने पक्षाच्या सामाजिक मेळाव्यात आमदार झाल्याच्या अविर्भावात तुमच्या समस्या मी विधानसभेत मांडून मार्ग काढतो, अशी उपस्थितांना चक्क ग्वाहीच देऊन टाकली. लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली, तरी किमान विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणर, या थाटात ते बोलून गेले. यातून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याची त्यांची खदखद जगजाहीर झाली.
भाजपच्या दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली ही खदखद तडस यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. शिवाय, भाजपच्या मातृ संघटनेतील अनेक पदाधिकारी अन् कार्यकर्तेही तडस यांच्यावर ‘नाराज’ असल्याचे सांगितले जाते. त्यांची नाराजी विरोधी उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते. मात्र, तसे काही होणार नसल्याचेही सांगितले जाते. तथापि, पक्षातील ही खदखद तूर्तास तडस यांची डोकेदुखी निश्चतच वाढवू शकते. विरोधकांची उदासीनता कायमचभाजप उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करून त्यांची हॅटट्रीक रोखण्याची नामी संधी यावेळी विरोधकांना चालून आली. मात्र, विरोधकांचा उमेदवारीचा गुंताच अद्याप सुटलेला नाही. त्यांना अजून पक्ष आणि उमेदवारही ठरविता आला नाही. निवडणुकीची घोषणा झाली असताना विरोधी उमेदवार कोण, याचा थांगपत्ता नाही. प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ महिनाभराचा अवधी उरलेला असताना विरोधकांमध्ये उदासीनता कायम आहे. त्यांची हीच उदासीनता भाजप उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.